कणकवली- महाराष्ट्रात महायुतीला अभुतपुर्व असे यश मिळाले आहे. एक है तो सेफ है.. मोदी यांनी दिलेल्या संदेशाला राज्यासह कोकणातील जनतेने पुर्णतः सेफ कौल दिला आहे. आता केंद्रापासुन राज्यापर्यंत सर्वच सत्ता महायुतीच्या आहेत. तसेच येथील खासदार, आमदार देखील महायुतीचेच निवडुन आल्यामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल. पुढील पाच वर्षात रत्नागिरी – सिंधुदुर्गात २ लाख रोजगार निर्माण होईल. कोकणातील जनता उबाठाच्या नादी न लागता महायुतीच्या पाठीशी राहीली आहे. उद्धव ठाकरेंनी आदीत्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद मिळवुन देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीत उबाठा विलीन करावी, असा टोला विधानसभा निवडणुक समन्वयक, माजी आ. प्रमोद जठार यांनी लगावला आहे.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलु सावंत, नरेंद्र भाबल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग – रत्नागिरी या लोकसभेतील ६ आमदार महायुतीचे निवडुन आले आहेत. यापुर्वी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी खासदार निवडुन दिला. आता महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी कोकणातील जनतेने आमदार निवडुन दिले आहेत. जसे महायुती यश मिळालं तसं महा विकास आघाडी का अपयश मिळाले? याबाबत लक्षात घेतले पाहीजे, उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असे सांगत होते. त्यावेळी शरद पवार यांनी निकालानंतर ज्याचे जास्त आमदार येतील त्याचा मुख्यमंत्री असे वक्तव्य केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी, उबाठाच्या लोकांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे काम केले. एकमेकांची पाडण्याची शर्यत लागली होती. सुषमा अंधारे यांनी तर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार या दोघांचा निषेध केला. चेहरा जाहीर केला नाही, म्हणुन पराभव झाल्याचे मत अंधारे यांनी व्यक्त केले. काही ठिकाणी त्यांच्यातच बंडखोरी झाली त्याचे पडसाद उमटले आहेत. राजापुर मध्ये अविनाश लाड बंडखोरी केली, त्यामुळे साळवी पराभूत झाले, असा टोला प्रमोद जठार यांनी लगावला.
महायुती सरकारने राज्यात गेल्या सहा महिन्यात घोषणा करून अंमलबजावणी वर काम केलं. शेतकऱ्यांचे वीज बिल माफी , लाडकी बहिण योजनेचे थेट पैसे जमा केले. त्यामुळे लोकांना हे अंमलबजावणी करणारे सरकार दिसुन आले. मुख्यमंत्री पदासाठी भांडत राहीले नाहीत. त्यामुळेच महायुतीला राज्यात अनपेक्षीत बहुमत मिळाले. कोकणात खा. नारायण राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे वादळ निर्माण करणार आहोत. महायुती आज पासून कामाला लागली आहे. नाणार प्रकल्प लोकांना नको असेल तर ज्याठिकाणी आवश्यक असेल तिथे होईल. शेतकरी तयार असल्यास खा. राणेंच्या नेतृत्वासाठी नाणारसाठी प्रयत्न केला जाईल. बाळासाहेबांचा शब्द काँग्रेसकडे हिंदुत्व गहाण ठेवत खरा केला आहे. त्यामुळे खरी बाळासाहेबांची विचारांची शिवसेना एकनाथ शिंदेसोबत आहे, असेही श्री. जठार म्हणाले. केसरकरांनी विशाल परबांचे आभार मानावेत सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अपक्ष विशाल परब यांनी घेतलेली मते ही माझ्या निवडणुकीप्रमाणे ना. दीपक केसरकर यांना चांगले मताधिक्य देणारी ठरली. जे माझ्या विरोधी पक्षात असलेले मित्र पराभुत झाले आहेत. त्यांनी आहात तिथे सुखी रहा, लोकांच्या कल्याणासाठी काम करा. राजकरणात वेगळ्या पक्षात असलो तरी त्यांनी काम करावे. या सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करावे. कोकणात कात टाकली जात आहे, नकारात्मक विचार चालणार नाही. जगातील चांगल्या गोष्टी आहेत, त्या कोकणी जनतेला हव्या आहेत. त्याचे आड येवू नये. संदेश पारकर उमेदवार असल्यामुळे किमान डिपॉझिट वाचले जर सतीश सावंत किंवा रावराणे असते तर डिपॉझिट जप्त झाले असते, असा टोला प्रमोद जठार यांनी लगावला.