8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कणकवली बस स्थानकात अपघात ; महिलेचा मृत्यू | नातेवाईकांनी घेतला आक्रमक पवित्रा

कणकवली : कणकवली बसस्थानकावर फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा दोन एसटी बस गाड्या परस्परांना धडकल्या. दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत फातीमा रीयाज बोथरे ( रा. उंबर्डे, वय – ३० ) वर्षीय महिला या दोन्ही बसच्या मध्ये सापडली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर तात्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्या महिलेच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. तपासणी अंती तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस व एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

मात्र यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त होत कणकवली बस स्थानकावर जमाव केला. यावेळी एकही बस स्थानकाबाहेर जाऊ दिली नाही. पहिले एसटीच्या अधिकाऱ्यांना बोलवा मगच बस स्थाकाबाहेर जातील, अशी आक्रमक भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, निसार शेख, सोहम वाळके, महेश कोदे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सोनू सावंत, अण्णा कोदे, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, आशिये सरपंच महेश गुरव आदी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली होती.

यावेळी दोन एसटीच्या चालक वाहकाना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी संतप्त झालेल्या त्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी एसटीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा मगच बोला असा इशारा दिला. मात्र यावेळी वाहतूक नियंत्रक असलेले श्री. परब हे आगारात उपस्थित नव्हते. यावेळी विभाग नियंत्रकांना घटनास्थळी बोलवा असे सांगितले असता वाहतूक नियंत्रकांनी घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केली. यावेळी जमलेल्या नागरिकांनी संतप्त होत आक्रमक पवित्रा घेऊ एकही बस स्थानकाबाहेर जाऊ देणार नाही असे सांगितले.यादरम्यान एसटीच्या अधिकाऱ्यांकडून बेजबाबदार उत्तरे देण्यात आली. तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे तपासा तसेच सीसीटीव्ही फुटेज दाखवा अशी मागणी करण्यात आली तेव्हा सीसीटीव्ही बंद असल्याचे चार्ज असलेले आगार प्रमूख श्री. यादव यांनी सांगितले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकरी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, कॉन्स्टेबल किरण मेथे, वाहतुक पोलीस हवालदार आर.के.पाटील, विनोद चव्हाण, मंगेश बावधाने तसेच होमगार्ड पथक तैनात करण्यात आले होते. यावेळी मृत महिलेला प्राथमिक मदत जाहीर करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी एसटी प्रशासनाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तसेच अपघाती मृत्यूची मदत कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर एक – दोन महिन्यात मिळेल, असे आश्वासन देण्यात आले.

त्या चालक वाहकांना सस्पेंड करा

दरम्यान यावेळी जमलेल्या संतप्त नागरिकांनी व मृत महिलेच्या नातेवाईकांनी ज्या चालक – वाहकाने हे कृत्य केले आहे, त्यांना तातडीने सस्पेंड करा अशी मागणी केली. यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी आपण योग्य प्रकारे कायदेशीर तक्रार नोंदवून त्या चालक वाहकाना कठोर शासन करू, असे सांगितले. तसेच सदर गाड्यांच्या इन्शुरन्स क्लेमनुसार मृत महिलेच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिले.

२३ तारीख नंतर त्या कुटूंबाला अपेक्षित मदत मिळेल – संदेश सावंत

बस स्थानकावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत तातडीने कणकवली बस स्थानक गाठले व घडलेल्या घटनेची माहिती घेतली. तसेच वाहतूक नियंत्रकांना फोन करून बोलवून घेतले. त्यावेळी बस स्थानकावरच भर उन्हात वाहतूक नियंत्रकांशी चर्चा झाली व अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार एसटी प्रशासनाकडून पाच लाखाची तातडीची मदत देण्यात आली. तसेच उर्वरित मदत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल असे सांगितले. तसेच निवडणुकी नंतर त्या कुटुंबीयांना अपेक्षित असलेली मदत केली जाईल तसेच आम्ही कायम त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असू असा विश्वासू शब्द संदेश सावंत यांनी त्या कुटुंबीयांना दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!