8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

फोंडाघाट येथे तरुणाचा मृतदेह आढळला | घातपात की आत्महत्या? याबाबत संभ्रम

कणकवली : फोंडाघाट – हरकुळ खुर्द रस्त्यावरील साखोळकर माइन्समध्ये जाणाऱ्या आडवाटेवर झाडाच्या फांदीला, नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत फोंडाघाटमधील युवक अल्पेश बाळकृष्ण गांधी (३०) या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. त्या झाडाच्या शेजारीच त्याची दुचाकी उभी केलेली दिसून आली.

शनिवारपासून अल्पेश हा गायब होता. अल्पेशचा घातपात झाला की त्याने आत्महत्या केली? याबाबत फोंडाघाट परिसरात संभ्रम पसरला आहे. शनिवारी अल्पेशने कणकवलीला जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला होता. रात्र होऊनही तो घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याचा भाऊ गणेश याने त्याला फोनवर संपर्क केला तर तो बंद होता. कामानिमित्त अल्पेश कोठे तरी बाहेर गेला असेल असे वाटल्याने कुटुंबीयांनी त्याचा जास्त शोध घेतला नाही. दरम्यान, आपल्या आईला अल्पेश याने ‘सॉरी मला माफ कर’ असा मेसेज मोबाइलवर केला होता.

सोमवारी त्याचा भाऊ गणेश हा कोल्हापूर येथे मित्राबरोबर गेला होता. त्यानंतर अल्पेश याचा मृतदेह मिळाल्याचे त्याला कळविण्यात आले. तो परतल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता झाडाला लटकलेला मृतदेह पोलिसांच्या उपस्थितीत खाली उतरून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच फोंडाघाट दूरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे आणि सहकारी सकाळी ७ वाजल्यापासून घटनास्थळी उपस्थित होते.

अल्पेश हा ठेकेदार म्हणून छोटी, मोठी कामे करत होता. शासनाकडून गेले अनेक महिने झालेल्या कामांची बिले न मिळाल्यामुळे तो तणावाखाली होता. असे काही निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत. अल्पेश याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!