कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता या मतदारसंघात एकूण सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे व उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यातच खरी लढत होणार आहे.
या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी छाननीच्या अंती एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. यापैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार प्रकाश नारकर व विश्वनाथ कदम यांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे, देवगड तहसीलदार लक्ष्मण कुसेकर, वैभववाडी सूर्यकांत पाटील उपस्थित होते.या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने आता रिंगणात सहा उमेदवार राहिले आहेत. यात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे, उबाठा शिवसेना मविआचे उमेदवार संदेश पारकर, अपक्ष उमेदवार गणेश माने, बंदेनवाज खानी, संदेश परकर व बहुजन समाज पक्षाचे चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे.