कणकवली : तालुक्यातील शिडवणे या गावातील कोणेवाडी या फाट्यावर एका बागेत जंगली बिबट्या मादी जातीचा वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. सदर मृत बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.तर जंगली बिबट्या नागरी वस्तीत येऊन मृत्यूमुखी पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,शिडवणे गावातील रहिवासी व सेवनिवृत्त पोलीस अधिकारी श्री विजय टक्के हे सकाळी नेहमी प्रमाणे मोर्निग वॉकला चालले असताना त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या कुत्र्याला वास आल्याने त्याने भूंकायला सुरवात केली. त्यामुळे कोणेवाडी फाटा जवळील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस रिटायर तलाठी श्री कोथिंबीरे यांच्या बागेत जंगली बिबट्या प्राणी मृत अवस्थेत आढळला.याबाबतची माहिती श्री विजय टक्के यांनी स्थानिक पोलीस पाटील समीर कुडतरकर व पोलीस स्टेशन कणकवली व वन अधिकारी याना दिली. सदर घटना आज शनिवार सकाळी ७.०० च्या दरम्यान निदर्शनास आली.
याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच वनाधिकारी श्री कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्याची पाहणी केली.
मात्र प्राथमिक पाहणीत या बिबट्याच्या अंगावर कोणतीही जखम दिसत आली नाही.तर सदर बिबट्या हा विष खाल्याने किंवा कोणतातरी आजार होऊन मृत झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.मात्र वनविभागाकडून मृत बिबट्याचा अधिकृत पंचनामा व पशू वैद्यकिय अधिकारी यांचा अहवाल आल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.दरम्यान वनविभागाच्या वतीने सदर मृत बिबट्याला कणकवली येथे पुढील तपासासाठी नेण्यात आल्याचे समजते. तर या घटनेचा अधिक तपास वनविभाग व पोलीस अधिकारी यांच्या मार्फत केला जात आहे.