कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदार संघासाठी माजी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खा. निलेश राणे यांनी कुडाळ विधानसभा मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल केला.
यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम व स्थावर अशी मिळून जवळपास ३२ कोटी ७५ लाख रूपये संपत्ती नमुद केली आहे. जिल्ह्यसह परजिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकात त्यांच्यावर १० फौजदारी खटले दाखल आहेत अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी गुरूवार दि. २४ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरूवात झाली. सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दाखल केलेल्या अर्जासोबत त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण दाखवले आहे. यामध्ये जंगम मालमत्तेत निलेश राणे यांच्या नावावर 15 कोटी 4 लाख 96 हजार 757 रूपये, पत्नी सौ. प्रियांका निलेश राणे यांच्या नावावर 8 कोटी 62 लाख 56 हजार 831 रूपये, मुलगा अभिराज निलेश राणे यांच्या नावावर 2 कोटी 9 लाख 49 हजार 136 रूपये, हिंदु अविभक्त कुटूंब मध्ये 73 लाख रूपये तर स्थावर मालमत्तेत 6 कोटी 41 लाख रूपये दाखविण्यात आले आहेत. निलेश राणे यांच्यावर 11 कोटी 99 लाख 4 हजार 52 रूपयाचे कर्ज आहे. पत्नी सौ. प्रियांका राणे यांच्या नावावर 4 कोटी 12 लाख 20 हजार 116 रूपयाचे कर्ज असुन हिंदु अविभक्त कुटूंब मध्ये 1 लाख 45 हजार रूपयाचे कर्ज असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
निलेश राणे यांच्यावर जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, चिपळूण, सावर्डे, खेड, सह बीड येथे मिळुन १० फौजदारी गुन्हे दाखल आहेत अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.