10 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

मच्छिमारांची आर या पारची लढाई

सर्जेकोट येथे मलपी ट्रॉलरवर आज छेडणार लाक्षणिक उपोषण

मालवण : मलपी कर्नाटक येथील हायस्पीड ट्रॉलर्सचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात अतिक्रमणा वाढत असून आठ दिवसापूर्वी पकडलेल्या मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर वर अद्यापही योग्य ती कारवाई मत्स्य व्यवसाय विभागाकडून झाली नसल्याने मच्छिमारांनी या विरोधात आर या पारची लढाई सुरु केली असून सर्जेकोट बंदरात उभ्या करून ठेवलेल्या या मलपी हायस्पीड ट्रॉलरवर आज स्थानिक मच्छिमारांकडून लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे तसेच गरज पडल्यास आमरण उपोषणही छेडले जाईल, असा इशारा मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

सिंधुदुर्ग व महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गेले कित्येक वर्ष मलपी कर्नाटक येथील हाय स्पीड ट्रॉलरची खुसखोरी होत आहे. त्यामुळे सागरी जैवविविधतेचे अतोनात नुकसान होत असून महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या तोंडचा घास पळून नेला जात आहे. सदर बेकायदेशीर मासेमारी संदर्भात मच्छीमारांच्या विविध संघटनांनी वेळोवेळी निवेदन ,उपोषण व आंदोलनाद्वारे आपला आवाज उठवला आहे. कर्नाटकातील या हाय स्पीड ट्रॉलरची मजल सागरी गस्त करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत गेली आहेत. तसेच लाखो रुपयांची स्थानिक मच्छीमारांची मासेमारी करण्याची जाळी या ट्रॉलर्सनी तोडून नेली आहे. नुकताच मलपी येथील बेकायदेशीर मासेमारी करणारा हायस्पीड ट्रॉलर्स सिंधुदुर्गच्या सागरी जलधीक्षेत्रामध्ये मत्स्य खात्याने पकडला होता. त्यामध्ये सुमारे सहा टन मासे आढळून आले होते. अशा प्रकारचे शेकडो ट्रॉलर्स सध्या सिंधुदुर्ग व उर्वरित महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालून झुंडीने येत दहशत निर्माण करीत आहेत. त्यांच्या या झुंडशाहीमुळे मच्छीमारांचे जीव पण धोक्यात आले आहेत. शासन दरबारी याची नोंद घेऊन ज्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे त्या प्रकारे होत नाही आहे. याकडे तात्काळ लक्ष वेधून वेगवान कारवाई करण्यासाठी सर्जेकोट बंदरात मत्स्य व्यवसाय खात्याच्या ताब्यात असलेल्या हाय स्पीड ट्रॉलरवर आज लाक्षणिक उपोषण सुरू करत आहोत गरज पडल्यास आमरण उपोषण सुरू करणार आहे, असे रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे. तरी मच्छीमारांनी आपापसातील वाद व भेदभाव बाजूला ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहनही तोरसकर यांनी केले असून कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आहे, असा इशाराही तोरसकर यांनी दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!