कणकवली : दसरा सण झाला की, दिवाळीचे वेध लागतात. दीपज्योती’ हे चिरंतन सर्वात्मक परमेश्वराचे प्रतीक आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये घराघरांवर आकाश कंदील लावण्यात येतात. उंच इमारतीच्या गच्चीत, घराच्या अंगणात उंचावर लावलेल्या आकाश कंदिलांमुळे अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय होतो. सध्या बाजारात आकाश कंदील विविध आकारात व प्रकारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हंडी कंदील, पर्यावरणपूरक कंदील यांच्याप्रमाणेच छोट्या आकाराच्या विविध छायाचित्रांचेही आकाश कंदील विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत.
यावर्षी नावीन्यपूर्ण प्रकारात कंदिलांवर छत्रपती शिवाजी महाराज, जाणता राजा, विविध देवतांचे फोटो असलेले कंदील ग्राहकांना भुरळ घालत आहेत. साध्या पतंगाच्या कागदापासून तसेच जिलेटिन कागदाच्या पारंपरिक चांदण्यारूपी आकाश कंदीलही उठून दिसतात.
एकूणच आकाश कंदिलांमध्ये विविध प्रकारच्या कलाकृतींचे, रचनात्मक कौशल्याची अनुभूती येते. रंगीबेरंगी कापडी, कागदी कंदील, हॅलोग्राफी, मार्बल पेपर, वेताचा वापर केलेले, फोल्डिंगचे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीत घरे, दुकाने, गल्लीबोळ असा सगळा परिसर विद्युतरोषणाईने झगमगत असतो. त्याचवेळी इमारतीच्या गॅलरीत, खिडकीबाहेर टांगलेले रंगीबेरंगी आकाशकंदील नजर वेधून घेतात.
संध्याकाळी ठिकठिकाणी लखलखणारे हे आकाश कंदीलच दिवाळीच्या प्रसन्न आनंददायी वातावरणाची निर्मिती करतात. सध्या विविध ठिकाणी आकाश कंदिलांचे स्टॉल्स लागल्यामुळे दिवाळीची चाहूल लागली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, आकारांचे, रंगांचे आकाश कंदील ग्राहकांना भुरळ घालत आहेत. कंदिलांनाही विशेष मागणी आहे. हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॅलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहेत.