कोल्हापूर : महानगरपालिकेतील ५०७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना निवडणूक आचारसंहितेपूर्वी कायम करण्याचे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे प्रयत्न निष्फळ ठरले. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा शासन निर्णय झाला, परंतु न्यायालयीन याचिका मागे घेण्यात विलंब झाल्याने आता सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रे मिळण्यासाठी आणखी एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील ५०७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आचारसंहितेपूर्वी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत नियुक्तिपत्रे देण्यासाठी आग्रह धरला. दि. १४ ऑक्टोबर रोजी शासन निर्णयाचा आदेश प्रशासनाला मिळाला. न्यायालयातील याचिका मागे घेण्याची प्रक्रिया कर्मचारी संघाच्या पातळीवर सुरू झाली. मात्र बारा याचिका दाखल झाल्या आहेत, त्याचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात विलंब झाला. त्यामुळे ही नियुक्तिपत्रांची प्रक्रिया निवडणूक संपल्यानंतरच पूर्ण केली जाईल तसेच नियुक्तिपत्रे दि. १४ ऑक्टोबर २०२४ या दिनांकापासूनच दिली जातील.