कणकवली : रस्त्याने चालत घरी जात असताना मनवा महेश राणे (३३ रा. कणकवली, फौजदारवाडी) यांना कनेडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात मनवा राणे यांना किरकोळ दुखापत झाली. मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानकाजवळील पुलाखाली हा अपघात झाला.
मनवा राणे या कणकवली रेल्वे स्थानक नजीकच्या सैनिक पतसंस्थेमध्ये काम करतात. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता कामावरून सुटल्यानंतर त्या चालत घरी जात होत्या. त्यादरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची त्यांना धडक बसली. त्यानंतर दुचाकीस्वार तेथे न थांबता पळून गेला. या अपघातात मनवा राणे यांच्या डाव्या व उजव्या पायाला तसेच डाव्या हाताच्या कोपराला व कमरेस दुखापत झाली.
याप्रकरणी मनवा राणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वारावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध कणकवली पोलिस घेत आहेत. दरम्यान, अपघातानंतर मनवा राणे या जखमी झाल्या आहेत. त्याचवेळी या मार्गावर कोण नसल्याने वाहन चालकाने तेथून पळ काढला.