कणकवली : देवगड तालुक्यातील पुरळ – हुर्शी, गडदेवाडी येथील निधी नीलेश थोटम यांचे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरातील कपाटाच्या तिजोरीतून चोरून नेले होते. ही घटना ११ ते १२ ऑक्टोबर या मुदतीत घडली होती. स्थानिक पोलिस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग या गुन्ह्याचा तपास करत होते. या गुन्ह्यात एक महिला व एक पुरुष असे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश मिळाले आहे.
या गुन्ह्याची नोंद विजयदुर्ग पोलिस ठाणे येथे झाली होती. गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना मिळालेली गोपनीय माहिती व तपास पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे संबंधित गुन्हा उघडकीस आलेला आहे. गुन्ह्यातील एक महिला व एक पुरुष असे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबधित आरोपींना विजयदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक हृषिकेश रावले यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे व आशिष जामदार यांनी ही कारवाई केली.