वैभववाडी : रेल्वे स्टेशनवरील समस्या, गैरसोयी या प्रवाशांनी मांडल्याच पाहिजे. प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच आमच्या नावापुढे पदे लागली आहेत. वैभववाडी रेल्वे स्टेशन वरती होत असलेले विकासात्मक बदल, मिळणाऱ्या सुविधा याही मान्य केल्या पाहिजे. इतर स्टेशन प्रमाणेच काही दिवसांत हे रेल्वे स्टेशन देखील सुसज्ज व दर्जेदार दिसेल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
वैभववाडी रेल्वे स्टेशनवरील पादचारी उड्डाण पुल कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष किशोर जैतापकर, सज्जनकाका रावराणे, प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र कांबळे, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, नगराध्यक्षा नेहा माईणकर, प्राची तावडे, शारदा कांबळे, नापणे सरपंच प्रदीप जैतापकर व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रमोद रावराणे यांचे विशेष प्रयत्न, वैभववाडी रेल्वे प्रवासी संघटना यांचे प्रयत्न यामुळेच स्टेशनवरील प्रश्न मार्गी लागत आहेत.
प्रमोद रावराणे यांच्या पुढाकाराने काही दिवसापूर्वी या रेल्वे स्टेशनला भेट दिली. रेल्वे प्रवासी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यातील प्रश्न, समस्या मार्गी लागत आहेत.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली, कुडाळ व सावंतवाडी रेल्वे स्टेशन सुशोभीत करून दाखवले. दरम्यान वैभववाडी रेल्वे स्टेशनचे काम न झाल्याने लोकप्रतिनिधींना अनेक आरोपांना सामोरे जावे लागले. रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण लवकरच होणार असा शब्द आम्ही दिला होता. या स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर पुल नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. खासदार नारायण राणे यांच्यामुळेच रेल्वेचे प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यांच्यामुळेच या पुलाला मंजुरी मिळाली आहे. मार्च 2025 ला प्रवाशांच्या सेवेसाठी हा पादचारी पूल सज्ज असेल असे यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रत्येक नागरिकांनी, प्रवाशांनी थोडा संयम ठेवला पाहिजे. रेल्वे विभागाचे जाळे खूप मोठे आहे. विकास कामे ही सतत पाठपुरावा व वजनदार लोकप्रतिनिधीमुळे होत असतात. या रेल्वे स्टेशनचे सर्वच प्रश्न सुटलेत असे मानणाऱ्यापैकी आम्ही नाहीत. परंतु दिसत असणारा विकासात्मक बदल याही गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत. काही दिवसातच वैभववाडी रेल्वे स्टेशन सुसज्ज सुशोभित व दर्जेदार दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी रवींद्र कांबळे, प्रमोद रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. राजेंद्र पाताडे यांनी मानले.