राजन तेली सेनेत आल्यास आनंद ; रुपेश राऊळ
सावंतवाडी : भाजपाच्या वाटेवर असलेल्या मंत्री दीपक केसरकरांना स्थानिक भाजपाच्या पदाधिकार्यांनी प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे पक्षातंर्गत नाराजी टाळण्यासाठी त्यांना शिवसेनेत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशी आपल्याकडे विश्वसनीय माहीती आहे. त्यामुळे आता केसरकर सावंतवाडी विधानसभा निवडणूक “धनुष्यबाण” चिन्हावर लढण्याची भाषा करीत आहेत, असा दावा ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान निवडणूकीच्या तोंडावर राजन तेली ठाकरे शिवसेनेत प्रवेश करीत असतील तर त्यांचे आम्ही निश्चितच स्वागत करु असे सांगत सावंतवाडी मतदार संघ शरद पवार राष्ट्रवादी लढणार की ठाकरे शिवसेना याबाबत अद्याप पर्यत चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. श्री. राऊळ यांनी आज शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका संघटक मायकल डीसोझा, विनोद ठाकूर, संदेश मडुरकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. राऊळ यांनी केसरकर यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, या ठिकाणी निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे गेली साडे चार वर्षे कोमात असलेले केसरकर आता जोमात आहेत. आणि कोट्यावधी रुपये खर्च करणार, वेगवेगळे प्रकल्प आणणार अशी घोषणा करीत आहेत. मात्र पंधरा वर्षे आमदार आणि सात वर्षे मंत्री राहून सुध्दा तुम्हाला काही करायला जमले नाही तर दोन दिवसात तुम्ही काय करणार? असा सवाल राऊळ यांनी केला. यावेळी ते म्हणाले, केसरकर आता धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार असे सांगत आहेत परंतु भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या केसरकरांना स्थानिकांनी पक्षात घेण्यास नकार दिल्यामुळे नाराजी लक्षात घेवून त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला. याबाबत आपल्याला गोपनीय माहिती मिळाली आहे. असा दावा श्री. राऊळ यांनी केला व शिवसेनेशी आणि पक्षप्रमुखांशी गद्दारी करणार्या केसरकरांना आता धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यास लाज वाटली पाहीजे, असे ते म्हणाले. तसेच बाळासाहेब प्रबोधिनीच्या माध्यमातून मुलांना स्पर्धा परिक्षेचे शिक्षण देणार असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी काहीच झाले नाही. शिवसेनाप्रमुखांच्या काळात असा प्रकार घडला असता तर त्यांनी केसरकरांवर लाथ मारली असती अशी टिका राऊळ यांनी केली. ते पुढे म्हणाले, सावंतवाडी मतदार संघ नेमका कोणी लढावा? याबाबत महाविकास आघाडीत निर्णय झालेला नाही या पार्श्वभूमीवर तेली, ठाकरे शिवसेनेत येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करु. विधानसभा कोणी लढवायची? याबाबतचा निर्णय वरिष्ट घेणार आहेत. त्यामुळे एवढ्यात काही बोलणे योग्य ठरणार नाही.