कणकवली : महाराष्ट्रातील घराणेशाहीप्रमाणे कोकणातील राजकारणात घराणेशाही नव्हती. पण राणे प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ती आता सुरू झाली आहे. भाजपमध्ये एकाच कुटुंबातील दोघांना तिकीट दिले जात नाही. त्यामुळे राणेच्या एका मुलाला शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश देऊन मालवणातून तिकीट देण्याचा घाट घातला जात आहे. घराणेशाहीचा हा प्रयत्न इथल्या मतदारांनी हाणून पाडावा अशी टीका माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज केली. येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राणेंना संपूर्ण सिंधुदुर्गच्या राजकारणावर ताबा हवा आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांवर राणे प्रायव्हेट लिमिटेडचा वचक ठेवायचा आहे. त्यामुळेच राणेंच्या दुसऱ्या मुलाला शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करून मालवण-कुडाळ मतदारसंघाचे तिकीट देण्याचा प्रयत्न होणार आहे. मात्र राणेंच्या याच मुलाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत कोणती भाषा वापरली होती. किती अनुद्ग्ाार काढले होते. त्याचा विचार आता मतदारांनी करायला हवा. उपरकर म्हणाले, राणेंनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना फक्त झेंडे लावण्यापुरतेच ठेवलेले आहे. एकाही कार्यकर्त्याला आमदारकीचे तिकीट दिलेले नाही. मला बाळासाहेबांनी विधान परिषदेवर संधी दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी राजन तेली यांना विधान परिषदेवर आणले होते. आता तेच राजन तेली भाजपमधून तिकीट मागत आहेत. पण राणे कुटुंबिय त्याला विरोध करत आहेत. उपरकर म्हणाले, राणे शिवसेना पक्षात असताना उमेदवारांना तिकीटे वाटत होते. पण अनेक पक्ष फिरून आल्यानंतर आता त्यांना आपल्या मुलाला तिकीट मिळावे यासाठी शिवसेना शिंदे पक्षापुढे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांनी आमदार व्हावे असे राणेंना कधीही वाटले नाही. त्यामुळेच परदेशात शिकत असलेल्या मोठ्या मुलाला त्यांनी लोकसभेचे तिकीट मिळवून दिले. तर दुसऱ्याला कणकवली विधानसभेची संधी दिली. आणखी काही वर्षानंतर राणेंचे नातू इथल्या मतदारसंघाचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फक्त राणेंचे झेंडे लावण्यापुरतेच काम करायचे का? याचा विचार करावा.