कणकवली : सिंधूदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह ठिकठिकाणी परतीच्या पावसाने रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. मेघ गर्जनेसह कोसळलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.
भात पिकाचे पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पोल कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. अचानक कोसळलेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे कापणीला आलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दुपार पासून ढगाळ वातावरण होते. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह विजा चमकत होत्या. त्यानंतर काही वेळातच पावसाने सुरुवात केली. ढगाळ वातावरणामुळे आधीच सर्वत्र काळोख पसरला होता. त्यातच वीज प्रवाह खंडीत झाल्याने काहीच दिसत नव्हते. तासभर तरी अशी स्थिती होती.
दरम्यान, या पावसाने कणकवली तालुक्यात असलदे येथे झाड उन्मळून पडले. तर विजेच्या खांबाचेही नुकसान झाले आहे. मात्र, या व्यक्तिरिक्त कोठेही मोठे नुकसान झाल्याची नोंद महसूल विभागात सायंकाळी उशिरापर्यंत झालेली नव्हती.