आंबोली : आंबोली कबुलायतदार जमिन वाटपा बाबत ग्रामस्थांनी आचारसंहितेआधी एकमताने निर्णय घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आंबोली येथे ग्रामस्थांच्या बैठकीत केले. तर सत्ता कायम नसते त्यामुळेच जोपर्यंत हातात सत्ता आहे तोपर्यंत निर्णय घ्या असेही आवाहन त्यांनी केले.दरम्यान लोकांचे प्रश्न सोडवल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत परंतु नव्याने या मतदारसंघात आलेले काही लोकं पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न करतात परंतु अशा भुरट्या लोकांना इथली जनता जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी जोरदार टीका मंत्री दीपक केसरकर यांनी नाव न घेता माजी आमदार राजन तेली व विशाल परब यांच्यावर केली.
ते पुढे म्हणाले की मतदारसंघातील बरेच प्रलंबित प्रश्न मी वरिष्ठ स्तरावर जाऊन सोडवले मात्र काही लोक दाखवण्यासाठी खूप काही शो करू शकता परंतु लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सुटले तर लोक आनंदी होतात त्यामुळे कोकणी जनता ही केव्हाही पैशाला विकली जाणार नाही असा मला विश्वास असल्याचा देखील केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. ते आंबोली येथे पत्रकारांशी बोलत होते.