आमदार नितेश राणे यांनी काढले गौरवोद्गार
कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्हा हा साक्षरतेमध्ये अग्रक्रमांकावर आहे. येथील ग्रामस्थ हे शिक्षण व शिक्षकाला महत्व देणारे आहेत. शाळेचा दर्जा कसा वाढवावा तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोग कसे करून घ्यावे याकडे बारकाईने लक्ष दिले जाते हे आनंदाची गोष्ट आहे. आपल्या पुढच्या पिढीच्या माध्यमातून तळ कोकणाचा व सिंधुदुर्गाचा पाया रचायचा आहे हे ध्येय नजरेसमोर ठेवून आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ज्या कार्याची शैक्षणिक उन्नती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ती अतिशय कौतुकास्पद आहे, असे मत आ. नितेश राणे यांनी व्यक्त केले.
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्राप्त निधीतून १६० शाळांना सोलर हायब्रिड इन्व्हर्टर मंजूर झाले आहेत. त्यामधील कणकवली, देवगड वैभववाडी, मालवण, कुडाळ तालुक्यातील १०९ शाळांना कणकवली महाविद्यालयाच्या सभागृहात आ. नितेश राणे व आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते या सोलर हायब्रिड इन्व्हर्टरचे वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मला सांगितले होते की शिक्षक आमदारांनी फक्त शिक्षक व शाळांसाठीच काम केले पाहिजे त्यानुसार मी त्यांच्याकडे शाळेमधील साहित्य खरेदीसाठी दोन कोटी ची मागणी केली होती ती त्यांनी कोणताही विचार न करता मान्य करून निधी मंजूर करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच माझ्या आमदार फंडातून गेल्या दीड वर्षात दहा कोटीचा निधी खर्च करून दोन हजार शाळा साहित्य दिलेले आहे. आताही कोणत्याही शाळेने मागणी केलेली नसतानाही सोलर हायब्रिड इन्व्हर्टर देण्यात येत आहेत. जेणेकरून शाळेमधील डिजिटल उपकरणे खराब होऊ नये व विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता येईल या उद्देशाने हे सोलर इन्व्हर्टर देण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रभाकर सावंत म्हणाले, गेल्या दोन वर्ष झालेल्या तीन निवडणुकांमध्ये शिक्षकांनी भारतीय जनता पक्षाला चांगले सहकार्य केले आहे. त्याबद्दल प्रथमतः मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो. तसेच शिक्षकांच्या ज्या काही विषय व मागणी आहे ते पूर्ण करण्याची आमचीही जबाबदारी आहे. त्यानंतर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व निरंजन डावखरे या दोघांनीही शिक्षक शाळा व संस्था यांच्याशी चांगला संपर्क ठेवला असून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व निरंजन डावखरे यांनी आपला आमदार निधी रस्ते आदी विकास कामांकडे खर्च न करता फक्त शाळा व शिक्षकांच्या विकास करण्यासाठी वापरावा, अशी विनंती श्री. सावंत यांनी केली.
या कार्यक्रमाला कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण, कुडाळ या तालुक्यातील शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.