कणकवली : तालुक्यातील तळेरे चाफार्डेवाडी येथील माळरानावर कणकवली पोलिसांनी छापा टाकून १ लाख ५९ हजार २०० रुपयाची गोवा बनावटी दारू जप्त केली. याप्रकरणी तेजस रवींद्र भांबुरे (३४, रा. तळेरे बाजारपेठ) व तुषार चंद्रकांत पेडणेकर (३६, रा. चिंचवली भंडारवाडी) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
तळेरे चाफार्डेवाडी येथे कणकवली पोलिसांना गोवा बनावटी दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील उपनिरीक्षक श्री. शेडगे, पोलीस नाईक रुपेश गुरव, महिला कॉन्स्टेबल तृप्ती कुळये, राजेश उबाळे यांच्या पथकाने चाफार्डेवाडी येथील माळरानावर जात छापा मारला. त्यावेळी तेथे एक व्यक्ती समोर बॉक्स घेऊन बसलेले निदर्शनास आली. तेथे जात पाहणी केली असता बॉक्समध्ये दारू आढळून आली. याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने आपले नाव तुषार पेडणेकर असे सांगितले. तसेच दारू कुठून आणली असे विचारले असता, त्याने हा सर्व दारू साठा तळेरे बाजारपेठ येथील तेजस भांबुरे यांचा असून मी त्यांच्याजवळ कामाला आहे, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूचे ५५ बॉक्स मधील १ लाख ५९ हजार २०० रुपयाची गोवा दारू जप्त केली.