उपस्थित रहाण्याचे आवाहन ; जानवली येथून सुरू होणार रॅली
कणकवली | मयुर ठाकूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केला आहे. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. यासाठी उद्या (दि. ५ ऑक्टोबर रोजी ) सकाळी १०:०० वाजता कणकवली येथे कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील नागरिकांची भव्य आरक्षण बचाव रॅली निघणार आहे, अशी माहिती भाजपा अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी दिली.
राहुल गांधी यांनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ ही रॅली निघणार आहे. संविधानाने अनुसूचित जाती जमाती सह इतर प्रवर्गाला आरक्षणाचा हक्क दिलेला आहे. तो संपुष्टात आणण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे याला विरोध करणार असून आमच्या हक्काचे आरक्षण हिसकावू देणार नाही. यासाठी एकत्रित येत आरक्षण बचाव रॅलीचे नियोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
ही रॅली जानवली पूल जलतरंग हॉटेल जवळून निघणार आहे. तेथून बस स्थानकानजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिष्टमंडळाच्या माध्यमातून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात संविधान बचाव रॅलीचे सभेत रूपांतर होणार आहे. आरक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असून तो हिसकावून घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला कडाडून विरोध करायचा आहे. यासाठी सर्व नागरिकांनी एकत्रित येत या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी केले आहे.