मालवणातील महिला आक्रमक ; पोलिसांना निवेदन सादर
मालवण : धुरीवाडा येथील प्रीती केळुसकर हिचा पेट्रोल ओतून जाळून खून केल्याप्रकरणी सुशांत गोवेकर याला पोलिसांनी अटक केली. यासंदर्भात आरोपीवर कठोर कारवाई होऊन आगामी काळात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मालवणातील महिलांनी एकत्र येत पोलिसांना निवेदन सादर केले. याचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांवर प्रसिद्ध होताच काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी सोशल मीडियावर मृत प्रीतीवर अश्लील शेरेबाजी करून आरोपीच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधात महिला पुन्हा एकदा आक्रमक बनल्या असून संबंधितांना अटक करून त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील धुरीवाडा येथील प्रीती केळूसकर या महिलेवर तिच्या घटस्फोटीत नवऱ्याने पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे केवळ मालवणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या गुन्ह्यातील नराधम नवरा सुशांत गोवेकर याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दोन दिवसांपूर्वी ही भयानक व हादरवणारी घटना घडली. एका महिलेला सुडभावनेतून जिवंत जाळण्यात आले. त्यामुळे मालवणमधील समस्त महिला पेटून उठल्या व मोर्चाने पोलीस ठाण्यावर जात आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आली आले. मालवण मधील ही अशी घटना अखेरचीच असावी हे महिलांचे निवेदन होते. त्याची बातमी प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिध्द झाली. तथापि सोशल मिडीयावरील त्या बातमीच्या खाली काही समाजकंटकानी खूप घाणेरड्या पद्धतीने मृत महिलेची अवहेलना होईल अशा पध्दतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नाही नाही त्या तऱ्हेच्या घाणेरड्या कमेंट पोस्ट केल्या आहेत. या गोष्टी समाजाला घातक आहेत व अशा समाजविघातक प्रवृत्तींना वेळीस वेसण घालणे गरजचे आहे. मृत महिलेची बदनामी करणाऱ्या या व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी, असे निवेदन सादर करीत त्या व्यक्तींनी केलेल्या कमेंटच्या स्क्रीन शॉटच्या प्रिंट पोलिसांना देण्यात आल्या आहेत.