मागील आर्थिक वर्षांत 1 कोटी 91 लाखांचा निव्वळ नफा
सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर
पतसंस्थेची 33 वि वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट चा आता विस्तार होत असून पतसंस्थेच्या नवीन शाखा कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्गात उर्वरित ठिकाणी सुरू करण्यास 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाटची 33 वि वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन गणपत वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे 22 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. दीपप्रज्वलन चेअरमन गणपत वळंजू, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुशे,तसेच अन्य संचालकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक संजय पेडणेकर, सुनील कोरगावकर, दिलीप पारकर, सुनील डुबळे, उमेश वाळके, समीर वंजारी, अनिता रेवडेकर, रश्मी माणगावकर, गणपत पारकर, माजी संचालक अरविंद शिरसाट , मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर, उपमुख कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना पिळणकर आदी उपस्थित होते. 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दिगंबर गोविंद तथा दादा कोरगावकर यांच्या प्रतिमेस गणपत वळंजू यांनी पुष्पहार अर्पण केला तर संस्थापक सेक्रेटरी कै. श्रीधर शंकर तथा दादा कुशे यांच्या प्रतिमेश उपाध्यक्ष चंद्रशेखर कुशे यांनी पुष्पहार अर्पण केला. संस्थेचे दिवंगत सभासद, भारतातील महनीय व्यक्ती खेळाडू शेतकरी सामाजिक कार्यकर्ते दिवगंत झाले त्यांना उपस्थित सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. सभासदांच्या पाल्य़ांनी इयत्ता दहावी बारावी पदवी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविले त्यांचा गुणगौरव संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने रोख रक्कम प्रशस्तीपत्रक सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
31 मार्च 2024 या आर्थिक वर्षातील संस्थेची आर्थिक स्थितीचा लेखाजोखा सभेत मांडण्यात आला. वसूल भाग भांडवल 3 कोटी 13 लाख , ठेवी 122 कोटी 59 लाख ,एकूण देणी व तरतुदी 3 कोटी 30 लाख , रोख व बँक शिल्लक एक कोटी 37 लाख, एकूण गुंतवणूक 37 कोटी सात लाख, एकूण कर्जे 99 कोटी 23 लाख, एकूण मालमत्ता 2 कोटी 5 लाख, इतर कर्जे 66 लाख 24 हजार आणि एकूण निव्वळ नफा एक कोटी 91 लाख रुपये इतका झाला आहे. संस्थेने नफा वाटणी करत असताना सभासदांना 2024 सालसाठी 13 टक्के इतका लाभांश जाहीर केला आहे
संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर पाचल लांजा तसेच चिपळूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी आजरा चंदगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली आचरा येथे नवीन शाखा सुरू करण्याचा ठराव मांडला त्यास उपस्थित सभासदांनी एकमताने मान्यता दिली त्यामुळे या गावांमध्ये लवकर संस्थेच्या नवीन 9 शाखा सभासदांच्या सेवेकरिता सुरू करण्यात येणार आहेत. सभेचे सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना पिळणकर यांनी केले.आभार मानताना मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांनी सर्व सभासदानी यापुढेही सकारात्मक सहकार्य करावे. सभासदांच्या पाठबळाच्या जोरावर कर्मचारी आणि संचालक मंडळ पतसंस्थेचे रूपांतर मल्टीस्टेट सोसायटीमध्ये करतील अशी ग्वाही दिली.