आ. नितेश राणेंकडून संतोष कानडे यांचे कौतुक
कणकवली | मयुर ठाकूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी केलेले काम माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांना अपेक्षित असे आहे. जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची चर्चा होईल तेव्हा संतोष कानडे यांनी केलेल्या कामाची नक्कीच दखल भविष्यात घ्यावी लागेल, अशा शब्दात आ. नितेश राणे यांनी संतोष कानडे यांचे कौतुक केले. कणकवली तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांना मानधन प्रस्ताव मंजुरीचे पत्र वाटप आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते.
यावेळी कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाउपाध्यक्ष सोनू सावंत, हेमंत परुळेकर, वागदे सरपंच संदीप सावंत, भाजपा जिल्हा कार्यालयाचे समर्थ राणे, भाजपा प्रसिध्द प्रमुख बबलू सावंत, सदा चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. नितेश राणे म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे हे ज्या – ज्या पदावर राहिले त्या – त्या पदाला त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आहे. तसेच काम झाले पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या हातात आलेली मंजुरी पत्र.! जेव्हा संतोष कानडे कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी आले, तेव्हा त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे, जोमाने आणि जिद्दीने काम केलेल आहे. आणि तेही पारदर्शकता ठेवून केलें आहे. त्यामुळे संतोष कानडे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अशा शब्दांत कानडे यांचे कौतुक केले.
यावेळी श्री. कानडे म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर कलाकारांना शासकीय कलाकार मानधनाचा लाभ मिळवून दिलेला आहे. मानधनात वाढ करून पाच हजार एवढी केलेली आहे. शंभर ऐवजी दोनशे कलाकार कोटा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी द्यावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलाकारांसाठी कला अकादमी व्हावी यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मागणी देखील करण्यात आल्याचे श्री. कानडे म्हणाले.