सावंतवाडी : श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणेश दर्शनासाठी आपण घरोघरी जात आहे. या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले म्हणून लाडक्या बहिणींमध्ये आनंद पाहायला मिळत असून हा आनंद पाहून निश्चितच समाधान वाटते. असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी पैसे वाटप करायलाही मन मोठे लागते व ते आमच्या सरकारकडे आहे, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, चौकुळ, आंबोली आणि गेळे येथील वन जमिनीची सेक्शन ६ अंतर्गत चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांवर निर्णय घेतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर उपस्थित होते.
आंबोली चौकुळ ,गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप प्रश्नी वन संज्ञा नोंद असलेल्या जमीन वाटपाचा प्रश्न अडचणीचा ठरला होता याबाबत वन सेक्शन ६ अंतर्गत चौकशी पूर्ण झाली आहे. आता हा प्रस्ताव महसूल खात्याकडे गेला असून आपण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. आता वनखात्याचा ३५ सेक्शन नोंद हटविण्यासाठी महसूल मंत्री निर्णय घेतील. आंबोली आणि गेळेचा जमीन वाटपाचा जीआर झालेला आहे.आता चौकुळचा जीआर काढला जाईल,तो लवकरच निघेल, असेही केसरकर यांनी सांगितले.
आंबोली , चौकुळ व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप, पायाभूत सुविधांची निर्मिती आरक्षण, रस्ते अशा कारवाई पूर्ण होतील. गेळे जमिनी बाबत फॉरेस्ट झोन लागला आहे तो नगरविकास खात्याकडे हटविला जाईल.चौकूळ येथे आज बैठक झाली आचारसंहितेपूर्वी जीआर काढण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे त्यांची मागणी लवकरात पूर्ण होईल असे ते म्हणाले.
शिरशिंगे धरण चौकशीसाठी रखडले होते आता सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन त्याची वेगाने कारवाई सुरू करण्याबाबत आपण पाठपुरा केला आहे. धरण मध्यम प्रकाराचे असल्याने शिरशिंगे आणि सांगेली दशक्रोशीतील जनतेला फायदा होईल आणि या भागाचा कायापालट होईल. पर्यटनासाठी देखील या धरणाचा उपयोग होईल असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
गणेश दर्शन घेताना आयटीआय झालेल्या मुलांना जर्मनीत जाण्याबाबत कानमंत्र दिला असून आयटीआय, नर्सिंग ,हॉटेल मॅनेजमेंट ड्रायव्हर असे कोर्स झालेल्या मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण दिलेल्याच्या मुलाखतीत व्हीजा देऊन त्यांना जर्मन मध्ये पाठविले जाईल असे त्यांनी सांगितले.
रोजगार निर्मितीचे देखील कार्य सुरू आहे अंडी उत्पादन ची क्षमता अडीचशे ते पाच लाख झाली आहे.कृषी आर्मीच्या माध्यमातून देखील शेती बागायती विकासासाठी प्रयत्न सुरू आहे. सर्वांना आम्ही बरोबर घेऊन जात आहोत. शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि अमुलाग्र बदल शिक्षण मंत्री झाल्यानंतर मला करता आला. त्याचा फायदा पवित्र पोर्टल माध्यमातून राज्यात भरती प्रक्रिया सुरू आहे. तर स्थानिक पातळीवर तात्पुरती डिएड बेरोजगारांची देखील भरती सुरू केली आहे, असे ते म्हणाले.
सावंतवाडी नगरपरिषदमध्ये मी भेट दिली. त्यावेळी स्वच्छता आणि विजेच्या बाबतीत देखील निर्देश दिले आहेत. मळगाव ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे ग्रामपंचायतला टाळे ठोकण्यात आले याबाबत देखील मी वीज अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावले आहे. नगर परिषदेतर्फे पार्किंग, स्वच्छता असे प्रश्न आहेत. अकरा दिवसांचे गणेश चतुर्थी झाल्यानंतर पुनश्च एकदा सावंतवाडी सुंदर करण्यासाठी पावले टाकले जातील असे केसरकर यांनी सांगितले. मोती तलावाच्या काठावरील बॅनर्स ११ दिवसांचे गणेश विसर्जनानंतर हटविले जातील.
विकास कामे आवश्यक आहेत व ती मी करतो. ज्या लोकांमुळे मी घडलो त्या जनतेपर्यंत समृद्धीचा मार्ग पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे आणि मी तेच करत आलेलो आहे. आमच्या कुटुंबाचे, माझे अनेक वर्षांचे संबंध जनतेशी आहेत व ते आजही मी टिकवून ठेवले आहेत .त्यामुळे गणेश चतुर्थीला मी काही ना काही मदत लोकांपर्यंत पोहोचवतो असे केसरकर यांनी सांगितले.
तर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल प्रश्न राजघराण्यातील राजे, राणी यांच्या सह्या झाल्या आहे. फक्त युवराज्ञी यांची सही व्हायची आहे ती लवकरच होईल. त्यामुळे तोही प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. अक्षय साईल मृत्यू प्रकरण पोलीस योग्य ती कारवाई करतील जर पोलीस कमी पडत असतील तर निश्चितच पोलिसांना कारवाई करण्यात भाग पाडू असे केसरकर यांनी सांगितले.