गणपती बाप्पा पाठोपाठ कोकणात मोठ्या भक्तिभावात गौराईच आगमन…!
कणकवली | मयुर ठाकूर : भक्तांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमना पाठोपाठ आज मंगळवारी गौरीच देखील आगमन झाल.सकाळी काही काळ पाऊस होता. ११ वा.च्या नंतर पावसाने उघडीप घेतल्यावर गौरी आणायला सुरूवात झाली.
कोकणात खड्यांच्या आणि मुखवट्याच्या अशा दोन प्रकारात गौरी आणल्या जातात.
मंगळवारी ‘गौराई आली सोन्या मोत्याच्या पावलांनी’ गौरीचे आगमन घरोघरी झाले. तसेच गौरीच्या सजावटीसाठी अलंकार व विविध आभूषणे खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र ही संतांची पवित्र पुण्यभूमी आहे. याच पवित्र भूमीला देवदेवतांची, निसर्गाची देणगी लाभली आहे. आषाढी एकादशी संपल्यानंतर श्रावणमास सुरू होतो. याच महिन्यापासून सणांना सुरुवात होते. तसेच पारंपारिक ‘फुगडी’ घालण्यास सुरुवात होते. या फुगडीमध्ये महिलांसह तरुणींचा सहभाग मोठा असतो. गणपती व गौरी अगमनामुळे संपूर्ण जिल्हा भक्तीमय वातावरणात मृदुंग-टाळ यांच्या गजरात न्हावून गेला आहे. सकाळपासूनच महिला गौरी आगमनाच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत होते.
पारंपरिक पध्दतीने आघाडा, तिरडा, सोंतळ या वनस्पती घेऊन विहिरी,नदीकिनारी जाऊन या वनस्पतींची विधीवत पूजा करुन फटाके फोडत मृदुंग व टाळांच्या गजरात या वनस्पतींना घरी आणले जाते. तत्पूर्वी घरी नेण्यापूर्वी मीठ, हळद अंगावरुन दृष्ट काढल्यानंतर गणरायाच्या डाव्या बाजूला तिची गौरी या रुपात पूजा केली जाते. अशी पारंपारिक प्रथा आहे. रात्री गौरीला नऊवारी हिरवी साडी नेसवून तिचा मुखवटा रत्नजडीत आभूषणाने सजवला जातो. तर काहिंकडे त्याच दिवशी गौरी सजवण्याची प्रथा आहे.त्यानंतर तिला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवून विधीवतपणे पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी पूजना दिवशी दुपारी काही गावांमध्ये गौरीला मांसाहार नैवेद्य दाखवला जातो. तर काही घराण्यांमध्ये शहाकारी नैवेद्य दाखवला जातो. गौरी ही दिड दिवसाची माहेरवाशीण असते. अशी आख्यायिका आहे. मंगळवारी सकाळपासूनच माहेरवासिणी आपल्या माहेरी दाखल झाल्या होत्या.तसेच गौरी पूजना दिवशी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा ‘ओवसा’ भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात होतो.
यावेळी महिला वर्ग नटून थटून हा सण साजरा करतात. गौरी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी- गणपतीचे विसर्जन देखील केले जाते.