मसुरे : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती मुंबई संचालित,ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण या प्रशालेमध्ये नव्यानेच तयार करण्यात आलेल्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ओझर विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थी, पालक त्याचप्रमाणे शिक्षकांनी शाळेत ऑनलाइन संगणक शिक्षण सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्याची संस्थेकडे मागणी करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे सुद्धा शाळेतील सर्व शिक्षकांनी, मुलांना ऑनलाइन संगणक शिक्षण सुरु करण्याची विनंती केली होती. त्यानुसार माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी अल्पावधीतच मुंबई येथील रोटरी क्लब, मुलुंड यांच्यावतीने पाच नवीन संगणक व मुंबई येथील त्यांचे मित्र श्री. मुकेश केनिया यांच्याकडून पाच नविन संगणक संच असे एकूण दहा संगणक संच उपलब्ध करून दिले. हे संगणक संच सुस्थितीत राहण्यासाठी नवीन संगणक कक्षाची उभारणी श्रीमती नीलम अनिल शेलटकर यांच्या सौजन्याने शालेय समितीचे सदस्य श्री. विजय शेलटकर यांच्या प्रयत्नाने करण्यात आली.
नवीन संगणक संच व नवीन कक्ष यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा प्रकारचे ऑनलाइन संगणक शिक्षण मिळणार आहे. सदर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सुहास पेडणेकर, श्रीमती नीलम अनिल शेलटकर त्याचप्रमाणे श्री. विजय शेलटकर यांचे ओझर विद्यामंदिर परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी तथा सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे माजी सहाय्यक आयुक्त श्री शामसुंदर पेडणेकर, माजी विद्यार्थी श्री मंगेश वायंगणकर, सुरेश भोजने शालेय समिती अध्यक्ष, श्री. किशोर नरे, सदस्य श्री. विजय शेलटकर श्री विजय कांबळी, श्री जयराम कांबळी, श्री. विशाल राणे,शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. जाधव, साहा. शिक्षक श्री अभय शेर्लेकर श्री एन एस परुळेकर, श्री शिवराम सावंत, श्रीमती पवार मॅडम, सर्व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक,माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षक श्री प्रवीण पारकर यांनी,तर आभार प्रदर्शन सहा.शिक्षक श्री पी. के. राणे यांनी केले.