१ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस;चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
कणकवली : गोवा येथून मुंबईला जाण्यासाठी मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या अलजेरिया मारिया डायस (४४ ) रा. सांताक्रुज – मुंबई यांची सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महत्वाचे कागदपत्र असलेली बॅग अज्ञातने चोरून नेली. ही घटना २६ ऑगष्ट रोजी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास घडली. याबाबत १ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्दे माल चोरीस गेल्याची फिर्याद तिने कणकवली पोलिसात नोंदवली आहे त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अल्जेरिया मरिया डायस यांचे कामानिमित्त पोर्तुगाल देशात येणे जाणे असल्याने त्यांनी पोर्तुगाल देशाचे नागरिकत्व स्वीकारले होते. २१ ऑगस्ट रोजी अल्जेरिया मरिया डायस या पतीसह पोर्तुगाल देशाचा ओरिजनल जन्माचा दाखला काढण्यासाठी पोर्तुगाल कन्सल्टंट पणजी येथे गेल्या होत्या. त्यादरम्यान त्या गोवा येथे आपल्या नातेवाईकांजवळ राहण्यासाठी होत्या. गोवा येथे थांबून २५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे जाण्यासाठी रात्री मेंगलोर एक्सप्रेस मध्ये बसल्या. थीविम स्टेशन नंतर अल्जेरिया मरिया डायस व त्यांचे पती हे झोपी गेले. त्यावेळी सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असलेली लॅपटॉपची बॅग ही त्यांच्याजवळ होती. मात्र मध्यरात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास अल्जेरिया मरिया डायस यांना कणकवली रेल्वे स्टेशन सोडल्यावर जाग आली असता त्यांना लॅपटॉपची बॅग दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती आपल्या पतीला दिली. बेंगलोर एक्सप्रेसच्या बोगीमध्ये त्या बॅगेचा शोध घेऊनही ती बॅग सापडली नाही. त्यामुळे सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्या बॅगेमध्ये एकूण २० ग्रॅम सोन्याच्या ८० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एकूण १० ग्रॅम सोन्याच्या ४० हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या, १५ हजार रुपयांची रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.