नऊ जण पोलिसांच्या रडारवर ; कोलगाव ग्रामस्थ आक्रमक, अटकेची मागणी
सावंतवाडी : गाडीच्या व्यवहारातून ब्लॅकमेल करून आपल्याला मारहाण झाल्यानेच कोलगाव येथील अक्षय साईल याने माडखोल धरणात आत्महत्या करून आपला जीवन प्रवास संपवला. या बाबत चिठ्ठी आणि स्टेटस मध्ये उल्लेख केल्यामुळे ही माहिती उघड झाली आहे. दरम्यान आज सकाळी त्याचा मृतदेह धरण परिसरात आढळून आला. त्यानंतर संतप्त झालेल्या कोलगाव ग्रामस्थांनी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ९ जणांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली. त्यानुसार त्या सर्व संशयतावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. कोलगाव येथील व्यवसायाने इंजिनियर असलेल्या अक्षय याची गाडी माडखोल धरण परिसरात आढळून आली होती. तर त्याने आपण लिहिलेली चिठ्ठी त्यातील संशयितांना पाठवून त्यांचे स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवल्याने या सर्व प्रकाराचा गुंता सुटला. दरम्यान त्याने आत्महत्या केल्याचा संशय होता. त्यानुसार सावंतवाडी पोलीस पोलिसांनी कोलगाव ग्रामस्थ व बाबल अल्मेडा टिम यांच्या मदतीने काल माडखोल धरणात शोध मोहीम राबवली होती. परंतु त्यांना अपयश आले होते. परंतू आज त्याचा मृतदेह सकाळी धरण क्षेत्रात रेनकोट घातलेल्या अवस्थेत आढळून आला. तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान अक्षयच्या आत्महत्या प्रकरणी आता वेगळी चर्चा सुरू झाली आहे. गाडीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादात आपल्याला ब्लॅकमेलिंग व मारहाण केल्यामुळे त्याने आपला जीवन प्रवास संपला, असे चिठ्ठीत म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी तब्बल ९ जणांच्या नावाचा उल्लेख केला आहे. यात सावंतवाडी-कोलगाव मधील ५ जण तर मुंबईमधील ४ असा त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याला धमकी देणाऱ्या मध्ये मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कोलगाव सरपंच संतोष राऊळ व अन्य ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले. यावेळी माजी आमदार राजन तेली उपस्थित होते. यावेळी त्यांनी सावंतवाडी पोलिसांकडे संबंधित आत्महत्येला जबाबदार ठरणाऱ्या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत श्री. तेली यांनी ग्रामस्थांसह पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आपण काही झाले तरी कोणाला सोडणार नाही, असे सांगितले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया सुरू आहे. दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. हा सर्व प्रकार गाडीचा अपघात झाल्याच्या कारणावरून घडला आहे. मुंबईतील एका व्यक्तीची गाडी अन्य एकाला भाड्याला देण्यात आली होती. त्यात अक्षयाने मध्यस्थी केली होती. मात्र त्या गाडीचा अपघात झाला. त्यानंतर गाडीचा इन्शुरन्स देण्यासाठी संबंधित इन्शुरन्स कंपनीने नकार दिला. त्यामुळे यातील तब्बल साडेआठ लाख रुपये हे अक्षय याच्याकडून वसूल करण्यासाठी तगादा लावण्यात आला. त्यातील ५ लाख रुपये घेण्यात आले. अन्य रक्कम ही देण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली तसेच त्याला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. यावेळी पैसे देत नाही या कारणावरून त्याला सावंतवाडीत मारहाण करण्यात आली. आपल्याला झालेल्या मारहाणी नंतर नैराश्य आल्यामुळे अक्षयने चिठ्ठी लिहिली आणि संबंधित संशयितांना व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांनी ही चिठ्ठी पाठवली व काही मित्रांना “हाय” असा मॅसेज टाकून आपल्या मोबाईलवर संशयितांचे फोटो आणि त्यांनी केलेले चॅटिंग स्टेटस म्हणून ठेवले. या सर्व प्रकारानंतर तो माडखोल धरणाच्या दिशेने तो निघून गेला व त्याने रेनकोट घालूनच आत्महत्या केली. यावेळी फोटोंचे आणि चॅटिंग चे स्टेटस लावलेला अक्षय नेमका कुठे गेला? हे कळू शकले नाही. दरम्यान त्याची इलेक्ट्रिक बाइक ही ओला कंपनीची असल्यामुळे नेव्हीगेशन मुळे ती धरणावर असल्याचे समजले. त्यानुसार त्या ठिकाणी शोध घेण्यात आला. त्यानंतर तेथील एका हॉटेलमध्ये मधील सीसीटीव्ही मध्ये अक्षय हा आपली गाडी घेऊन धरणाच्या दिशेने जात असल्याचे दिसला. मात्र तो परत येताना दिसला नाही. त्यामुळे सर्वांचा संशय बळावला. त्यानुसार काल शोध मोहिम राबवण्यात आली. यावेळी धरणाच्या सांडव्यावर अक्षयचा मोबाईल व चप्पल आढळून आले. त्यामुळे त्याने आत्महत्याच केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार त्याचा तपास सुरू केला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह रेनकोट घातलेल्या अवस्थेत असून आला. धरणात मगरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याच्या शरीराचे लचके मगरीने तोडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अक्षय हा मनमिळाऊ होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. गेले तीन दिवस त्याचा मित्रपरिवार त्याचा शोध घेत आहे. तो एक वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या या अशा जीव घेण्या निर्णयामुळे उपस्थित असून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तो मनमिळावू होता. त्याला कोणतेही व्यसन नव्हते असे असताना केवळ त्याला धमकी देऊन मारहाण केल्यामुळे त्याने हा नैराश्यातून प्रकार केला असावा, असा संशय कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांनी व्यक्त केला आहे तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.