कणकवली : प्रलंबित मागण्यांसाठी ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. सहा महिने कृती समितीच्या माध्यमातून पगार वाढ होण्यासाठी निवेदन दिली जात आहेत. शासनाच्या चालकांप्रमाणे एसटीच्या चालकांना देखील पगार वाढ आणि महागाई भत्ते तसेच मागील विसंगती पूर्णपणे दूर व्हाव्या यासाठी कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनासोबत चर्चा केली होती. यामध्ये सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत चर्चा करायचे.सकारात्मक चर्चा व्हायची, पण पुढे निर्णय व्हायचा नाही. त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून ९ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनाबाबत शासन – प्रशासनाला नोटीस दिली गेली. ७ तारीख ला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. चर्चेनुसार समिती स्थापन झाली. त्यानंतर निर्णय देऊ असे आश्वासित केले गेले. मात्र २० तारीख यावेळी देण्यात आली. २० तारीख उलटून गेली तरी मंत्री महोदयांकडून तारीख देऊन देखील बैठक न घेता या चर्चेवर टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रशासनाकडून कोणताही निर्णय दिला गेला नाही. म्हणून २३ रोजी प्रशासनाला जाग यावी यासाठी एसटी विभागीय कार्यशाळा कणकवलीच्या गेटवर आंदोलन करण्यात आले. त्याची दखल न घेतल्याने आज (०३) सप्टेंबर रोजी प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याच्या नोटिसा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज (०३ सप्टेंबर ) रोजी कणकवली येथील एसटी विभागीय कार्यशाळेच्या गेटवर आंदोलन करण्यात आले.
मात्र या सगळ्याचा फटका आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला बसताना पाहायला मिळतोय. सिंधुदुर्गातील ८ डेपो पैकी सावंतवाडी, देवगड डेपो हे पूर्णतः बंद असून वेंगुर्ले, कणकवली, कुडाळ, ओरोस, मालवण, वैभववाडी या बस स्थानकांमधून प्रवासी वाहतूक सेवा अंशतः सुरू असल्याचे चित्र आहे.
आमच्या मागण्या पूर्ण करा. आम्ही आजही बैठकीसाठी यायला तयार आहोत. आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहोत. प्रवासांची गैरसोय होऊ देणार नाही. मात्र आमचा थोडाफार तरी विचार शासन – प्रशासनाने केला पाहिजे, असे म्हणणे यावेळी आंदोलन कर्त्यांनी मांडले.
काही संघटनांकडून एसटीचे काम सुरू ठेवण्यात आले होते. मात्र आता हळूहळू त्याही संघटना संपात उतरताना दिसत आहेत. त्यामुळे हा संप एकजुटीने होत असल्याचे सिंधुदुर्गात चित्र आहे.
यावेळी विभागीय कार्यशाळा सचिव दत्तप्रसाद मराठे, विभागीय कार्यालय सचिव अमिता राणे, संयुक्त कृती समिती अविनाश रणसिंग, आबा धुरी, कामगार सेना विभागीय अध्यक्ष संदिप सावंत आदी उपस्थित होते.