हळवल फाटा येथे हळवलसह पंचक्रोशीतील गावांमध्ये जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था ; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हळवल येथील नवीन कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचीच दुरवस्था
कणकवली | मयुर ठाकूर : सध्या प्रशासनाकडून गणेश चतुर्थीपूर्वी हायवे असो किंवा ग्रामीण भागामध्ये जाणारे रस्ते असो हे वाहतुकीस सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधी देखील रस्त्यांबाबत प्रामुख्याने घोषणा करताना दिसून येत आहेत. मात्र काही ठिकाणचे रस्ते हे आता रस्ते न राहता विहीर सदृश्य बनलेले पाहायला मिळत आहेत.
छायाचित्रातील जी दृश्य आहेत ती मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील! हळवल गावासह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक याठिकाणाहून प्रवास करत असतात. हळवल रेल्वे फाटकानजिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन कार्यालय उभारणीचे काम देखील सुरू आहे. अस असलं तरी याठिकाणाहून प्रवास करतांना वाहनचालकांना नक्की वाहने कोणत्या ठिकाणाहून चालवायची हेच कळत नाहीय.
रस्त्याच्या दोन्ही बाजुला भले मोठे खड्डे आणि त्यात चिखल…! तर दुसरी कडे सायंकाळच्या वेळेत दाट अंधार होत असल्याने याठिकाणच्या खड्ड्यांचा अंदाजही येत नाही. तसेच गणेश चतुर्थी म्हटल्यावर कोकणात चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणात दाखल होतो. वाहनांची वर्दळ वाढते. हळवल फाट्यावर या कालावधीत प्रामुख्याने रात्रीच्यावेळी अपघातांची संख्या वाढलेली पाहायला मिळते. त्यामुळे याठिकाणी हायमास्ट ची मागणी देखील गेली अनेक वर्ष केली जात आहे. तरीही याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्षच करत असल्याचे दिसून येत आहे. तर त्याच ठिकाणचा रस्ता हा मोठ्या प्रमाणात खचलेला असल्याने त्या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देऊन सुरळीत करतील काय असा सवाल वाहन चालक आणि नागरिक उपस्थित करत आहेत.