कणकवली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष वाढविण्यासाठी मराठा समाज, कुणबी समाज त्याचप्रमाणे अन्य बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या घटकांना एकत्र घेऊन संघटनेचा विस्तार करावा लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी लवकरच मेळावा घेण्यात येणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला सत्तेत सहभाग मिळावा, ही आमची मागणी असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी सांगितले.
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बांधकामात भ्रष्टाचार झाला असे म्हणणाऱ्या विरोधकांना माझा सवाल आहे. छत्रपती शिवरायांसारख्या महामानवाच्या पुतळ्याच्या कोणी भ्रष्टाचार करू शकतो का याचा विचार आरोप करणाऱ्यानीच करावा. या विषयात राजकारण करू नका. जोडे मारो सारखे आंदोलन चुकीचे असून चौकशी समितीचा अहवाल आल्यावर जबाबदार ठरलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे असे सांगताना रिपाई पक्षाला लोकसभेच्या दोन जागा महायुतीच्या नेत्यांनी दिल्या असत्या तर आमच्या मागणी प्रमाणे शिर्डी आणि नगर या जागांचे निकाल वेगळे लागले असते. मात्र महायुतीच्या नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी राजकोट येथील पुतळा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासमवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.
ना. आठवले म्हणाले, मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे हा देशतील पहिलाच प्रकार असावा. अमेरिकेत तीन समुद्रांमध्ये असलेल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी हा पुतळा शेकडो वर्षे उभा आहे. मोठे वादळ होतात तेव्हा एखादी घटना घडते मात्र पुतळा कोसळण्याची घटना पहिलीच आहे. पुतळा कोसळण्याऐवधी हवा मुळात नव्हतीच. पुतळा योग्य पद्धतीने उभारला गेला नसल्याने आणि नवीन कलाकाराने अनुभवाशिवाय बनविला असल्याने तो कोसळला असावा. छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत असलेले छत्रपती होते. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय देशाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. शिवाजी महाराज मुघलांविरोधात लढले नसते तर सारा देश मुघलमय झाला असता. त्या शिवरायांचा पुतळा आशा प्रकारे पडावा ही अपमानास्पद घटना आहे. मुखमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून समिती देखील नेमली आहे. मात्र नवोदित कलाकारांना एवढा मोठा पुतळा बनविण्याचे काम दिलेच कसे ? असा सवाल करताना ते म्हणाले, महाराष्ट्रात राम सुतार, सारंग, यांच्यासारखे मोठे कलाकार असताना नवख्या कलाकारांना ऑर्डर का देण्यात आली ? याचा विचार करावा. पुतळा पडणे ही बाब गंभीर आहे त्यामुळे पुतळा पडण्याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
तज्ञ समिती नेमा
ना. आठवले म्हणाले, सत्ताधारी, विरोधक व तज्ञ लोकांची एक समिती नेमावी आणि त्या माध्यमातून पुतळे उभारताना घेण्यात येणारी दक्षतेवाबत या समितीचे मार्गदर्शन घेण्यात यावी अशी मागणी राज्याच्या मुखमंत्र्यांकडे आपण करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
पुतळ्यात भ्रष्टाचार कसला ?
आज राज्यातील विरोधक हे पुतळा पडल्या प्रकरणावरून भ्रष्टाचार चा आरोप करीत आहेत. मात्र काही काळ तेही सत्ताधारी होते हेही त्यांनी लक्षात घ्यावे. शिवरायांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचार होऊ शकतो का ? शिवराय हे दैवत असून महामानवाच्या पुतळ्यात कोणी भ्रष्टाचार करेल असे म्हणता येणार नाही. असे सांगताना विरोधकांकडून याविषयीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
महायुतीचे दुर्लक्ष
सिंधुदुर्गात रिपाई पक्ष वाढत नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना. आठवले म्हणाले, सिंधुदुर्गात म्हणावा तसा पक्ष वाढत नाही ही बाब खरी आहे. येथील नेतृत्वाने पक्षासाठी वेळ देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात दलित समाजाची संख्या कमी असल्याने पक्ष वाढीला मर्यादा आहेत. मात्र ओबीसी आघाडी, मराठा, कुणबी, यांसारख्या घटकांना घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जातील. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे आम्ही शिर्डी व नगर या दोन जागांची मागणी केली होती. शिर्डी मधून मी स्वतः इच्छुक होतो. मात्र याच्या मागणीकडे महायुतीच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. म्हणूनच या दोन्ही जागा महायुतीला गमवाव्या लागली. आम्हाला संधी दिली असती तर चित्र वेगळे दिसले असते. अशी खंत व्यक्त करतानाच रिपाई ल सत्तेत वाटा यापुढे मिळायला हवा अशी आमची यापुढे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.