चोरट्यानेच डबा आणून टाकल्याचा पोलीसांचा संशय
सावंतवाडी : वेत्ये येथे झालेल्या घरफोडीत चोरीला गेलेले काही दागिने सिताराम पाटकर यांच्या घराच्या मागील बाजूला आढळले आहेत. त्यात एक मंगळसूत्र, दोन अंगठ्या आणि नथ आधींचा समावेश आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली. ज्या चोरट्याने चोरी केली त्यानेच हा डबा आणून त्या ठिकाणी टाकला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
वेत्ये येथील पाटकर यांच्या घरात चोरी झाली होती. यात अंदाजे अडीज लाखाचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. हा प्रकार पाटकर घरात नसताना घडला होता तसेच संबंधित चोरट्याने पिकाव घेऊन भिंत फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या चोरी मागे कोणीतरी माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.
दरम्यान पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे त्या ठिकाणी माग घेण्यासाठी श्वान आणणे शक्य नव्हते. तरीही पोलिसांचा तपास सुरू होता. दरम्यान आज सकाळी पाटकर यांच्या घराच्या लागून असलेल्या परिसरात चोरीला गेलेल्या दागिन्याचा डबा आढळून आला. यात काही दागिने मिळून आले आहेत.
याबाबतची माहिती त्यांनी पोलिसाला दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यात काही दागिने मिळून आल्याचे त्यांचे म्हणणे त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर या प्रकरणात संशयित चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांचे म्हणणे.