26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या नावालासाजेसं असे स्मारक : उपमुख्यमंत्री अजित पवार 

मालवण : राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या नावालासाजेसं असे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे. पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडण्यास जे दोषी आहेत. त्या संपूर्ण प्रकाराची खोलात जाऊन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिले.

दरम्यान हे स्मारक उभारण्याबरोबरच किल्ला परिसराचा विकास करण्यासाठी खासगी जमिनमालक आपल्या जमिनी देण्यास तयार असून त्या जागा घेण्याचा विचार सुरू असल्याचेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार वर्षा झालटे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता अजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अबीद नाईक, काका कुडाळकर, प्रफुल्ल सुद्रिक, सुरेश गवस, नाथ मालोंडकर, बबन शिंदे, राजा गावकर, किसन मांजरेकर, एम. के. गावडे, प्रज्ञा परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. अनेक ठिकाणी महाराजांचे अश्वारूढ पुतळे, सिंहासनावर बसलेले पुतळे, उभे असलेले पुतळे उभारण्यात आले आहेत. सर्वजण त्यांना आदराने नतमस्तक होतात आणि त्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत असते. राजकोट किल्ला येथील शिवाजीमहाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात त्याच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. महाराजांच्या नावाला साजेसे असे स्मारक येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय होत असताना या किल्ल्याच्या परिसरातील ज्या खासगी जमिनी घेण्याचा विचार झाला आहे. राजकोट किल्ला येथे बारकाईने लक्ष देऊन उत्तम प्रतीचा पुतळा उभारला जाणार आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देण्यात आले आहे. ते म्हणाले, नौदल दिनाच्या वेळी या पुतळ्याचे अनावरण झाले तेव्हा येथे सर्वकाही व्यवस्थित होते. त्यानंतर जे काही घडले त्याची अत्यंत खोलात जाऊन चौकशी केली जाणार आहे. या पुतळ्याचे ज्यांनी काम केले. त्या व्यक्ती अजूनही सापडत नाहीत. परंतु त्या व्यक्ती पळून पळून कुठे जाणार? महाराष्ट्रात बाहेर तर जाणार नाहीत ना? त्यांना शोधून त्यांच्याकडून प्रकरणाची शहानिशा केली जाईल. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार त्याचप्रमाणे या क्षेत्रातील अनुभवी रचना सल्लागार, स्ट्रक्चरल ऑडिटर हे सुद्धा या ठिकाणी भेट देतील ते सुद्धा आपली मते तपास यंत्रणेला देतील. शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मी या ठिकाणी येऊन प्रशासनाला कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. याउलट या दुर्घटनेबद्दल सुरुवातीपासूनची माहिती जाणून घेतली. प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री याबाबतचा सर्वांशी बोलून निर्णय घेतील. जे ठरविले जाईल ते अंतिम असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरही अजितपवारांनी भाष्य करत प्रत्येक नेत्याने, कार्यकर्त्याने तारतम्य ठेवायला हवे. महाराष्ट्राची संस्कृती जोपासली पाहिजे असे सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!