मनसेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांकडे मागणी
कुडाळ : राजकोट येथे कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आता तरी विटंबना थांबवा. अशा प्रकारचे आदेश प्रशासनाला द्या, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.दरम्यान शासकीय नियमानुसार पंचनामा करून महाराजांच्या पुतळयाचे विखुरलेले अवशेष एकत्र करून त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी ही मागणी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडून ४ दिवस झाले.
पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ पाहणी दौराही केला. दोशींवर गुन्हा दाखल करणे किंवा कडक कारवाई करणे संदर्भात प्रशासनाला आदेश दिले. दोशींवर कारवाई सुद्धा होईल.त्यानंतर राजकीय फायद्यासाठी असेल किंवा नैतिकतेसाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांचे पाहणी दौरे आयोजित करून आपसात राडेही करून झाले. परंतु महाराजांचा पुतळा पडून ४ दिवस झाले तरी पुतळ्याचे विखुरलेले अवशेष तसेच पडून असल्यामुळे त्या अवशेषांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य सूचना करावी. तसेच शासकीय नियमानुसार पंचनामा करून महाराजांच्या पुतळ्याचे विखुरलेले अवशेष सुरक्षित ठिकाणी कडक बंदोबस्ता मध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी. असे श्री. किनळेकर म्हणाले.