सहाव्या वर्धापन दिनानिमित्त युवा फोरम भारतचा निर्धार: यशवर्धन राणे आणि सचिव हितेश कुडाळकर यांची माहिती..
कुडाळ : आपल्या जिल्ह्यात थेट रोजगार नसेल पण जिल्हयातल्या लोकांकडे कौशल्य आहे, वेगवेगळी कला आहे. त्यांचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी कसा करता येऊ शकेल या दृष्टीने युवा फोरम भारत हि संस्था काम करणार असल्याचे ऍड. यशवर्धन यांनी म्हटले आहे. युवा फोरम भारत या संस्थेचा सहावा वर्धापन दिन आज २५ ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात आला. या निमित्ताने युवा फोरम भारत या संस्थेची वाटचाल आणि भविष्यातील उपक्रम या विषयी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. यशवर्धन राणे आणि सचिव ऍड. हितेश कुडाळकर यांनी पत्तार परिषदेत माहिती दिली.
युवा फोरम भारत या तरुणांच्या संघटनेचा आज सहावा वर्धापन दिन आहे. त्यानिमिताने कुडाळमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषद घेऊन युवा फोरम भारत या संस्थेने गेल्या सहा वर्षात केलेल्या कामाचा आढावा आणि भविष्यत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती संस्थापक अध्यक्ष ऍड. यशवर्धन राणे आणि संस्थापक सचिव ऍड. हितेश कुडाळकर यांनी दिली. यावेळी. यावेळी कार्यकारणी सदस्य संकेत राणे, जिल्हाध्यक्ष शुभम सिंदगीकर, तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, भूषण मेस्त्री, सर्वेश पावसकर, रोहन करंबेळकर, भूषण कांबळी, रोहित आटक, अभिजित शेडगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऍड हितेश कुडाळकर यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. २०१८ मध्ये अवघ्या पाच जणांनी युवा फोरम भारत हि संस्था स्थापना केली. विविध समाजपयोगी कामे संस्थेच्या वतीने करण्यात आली. स्वच्छता मोहीम, कुडाळ नगर पंचायतीबाबत लोकांच्या समस्या सोडविणे, वृक्षारोपण, महिला सबलीकरण, महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप, भटक्या कुत्र्यांवरऔषोधोपचार, चिपळूणच्या पूरपरिस्थितीत मदत, वह्या वाटप, आरोग्य शिबिरे असे उपक्रम गेल्या सहा वर्षात राबविण्यात आले. युथ फोरम हि संस्था केवळ सिंधुदुर्गपुरती मर्यादित नाही. तर पुणे, मुंबई आणि अन्य शहरांमध्ये संस्थेचे काम सुरु आहे. या संस्थेचा विस्तार हळूहळू होत आहे. सध्या या संस्थेचे सुमारे ६०० सदस्य झाले आहेत. मारिन ड्राइव्ह मुंबई येथे दर रविवारी युवा फोरम भारताच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविली जाते. भविष्यात नवीन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. तसेच महिला अत्याचार विरोधी उपक्रम आणि जनजागृती करण्यात येणार असल्याचे ऍड. हितेश कुडाळकर यांनी सांगितले.
ऍड. यशवर्धन राणे यांनी सर्व युवकांना आणि आपल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. युवा फोरम संघटना जेव्हा सुरु केली तेव्हा या संस्थेच्या क्षमतेविषयी शंका घेण्यात आली. संस्था दुसऱ्या संघटनेत किंवा राजकीय पक्षात विसर्जित करण्याची पण सूचना काही जणांनी सुरुवातीला केली. काही जणांनी तर थोड्याच दिवसात हि संस्था बंद पडेल असे पण सांगण्यात आले. पण युवा फोरम हि संस्था एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेत सर्व राजकीय विचारसरणी असलेले तरुण काम करतात. माणुसकी जिवंत ठेवणे आणि माणुसकीचा प्रचार व प्रसार करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. जो पर्यंत माणुसकी जिवंत आहे, जो पर्यंत आमच्या सारख्या युवकांचे श्वास सुरु आहेत तोपर्यंत युवा फोरम संस्था सुरु राहणार आहे.असा विश्वास ऍड. यशवर्धन राणे यांनी व्यक्त केला. युवा फोरम भारत संस्थेच्या वतीने लवकरच रोजगार मेळावा आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यात कला कौशल्याच्या माध्यमातून रोजगार उभा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भातील वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे मार्गदर्शक याना येथे आणून येथील युवकांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी आमचा प्रयत्न सुरु असल्याचे ऍड. राणे म्हणाले..