नालासोपारा : श्रीराम नगर परिसरातील एका बंद घरात एकाचा धारदार हत्याराने गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने खळबळ माजली आहे. पेल्हार पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ही हत्या कोणी व का केली याचा शोध घेत तपास करत आहे.
श्रीराम नगरच्या घरत वाडी येथील जोगेंद्र यादव चाळीत प्रमोदकुमार उर्फ कतवारू बिंद (५१) हे दोन मुले व एका सुनेसह राहत होते. घरातील बाकीचे गावी गेले होते व प्रमोदकुमार हेच घरी एकटे होते. त्यांचा मोठा मुलगा प्रदीपकुमार याने शनिवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास काकाचा मुलगा आशिष याला फोन केला. वडिलांचा फोन लागत नसून तो बंद असल्याने फोन का बंद आहे हे घरी जाऊन खात्री करून फोन करण्यास सांगितले.
काका दीपनारायण बिंद आणि त्यांचा मुलगा आशिष घरी गेल्यावर घराच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावून बंद असल्याचे त्याला दिसले. दरवाज्याच्या बाजूला खिडकी उघडी असल्याने असल्याने आशिषने डोकावून पाहिल्यावर घरात रक्त दिसले. तसेच प्रमोदकुमार यांचे पाय जमिनीवर दिसले. त्यामुळे लहान भाऊ आणि त्याच्या मुलाने खात्री करण्यासाठी दरवाजाचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. प्रमोदकुमार हे उताण्या अवस्थेत व गळ्यावर धारदार हत्याराने वार करून रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यांनी लगेच पेल्हार पोलिसांना घटनेची माहिती दिली. पेल्हार पोलिसांनी कोणत्यातरी कारणावरून आरोपीने प्रमोदकुमार यांचा गळा चिरून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.