कणकवली : बदलापूरमधील बालिकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने कणकवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे एकत्र येत या घटनेचा निषेध केला. अत्याचाराविरोधात पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतला तरी ठाकरे शिवसेनेसह राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, कॉंग्रेस, आम आदमी पार्टी यांनी तोंडावर काळ्या पट्या बांधून निदर्शने करण्यात आली. मुंबई हायकोर्टाने बंद बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत बंद करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाला देताच महाविकास आघाडीने बदलापूरमधील बालिकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतला. बंद जरी मागे घेण्यात आला तरी निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बदलापूरमध्ये २ चिमुरड्या बालिकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा धिक्कार आणि निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस म्हणजेच कॉंग्रेस (आय) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने शनिवारी अन्य काही सहविचारी पक्षांनी देखील महाविकास आघाडीला पाठींबा दिला.
यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड, संकेत नाईक, सी.आर. चव्हाण, सचिन सावंत, प्रवीण वरूणकर, जयेश धुमाळे, विलास गुडेकर, विशाल आमडोसकर, शिवसेना महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सदावर्तेंच्या पाठून वार करणार्या सरकारचा निषेध असो.. छत्रपती शिवाजी महाराज की जय… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.. अशा घोषणा देण्यात आल्या. महाविकास आघाडीच्यावतीने सुरुवातीला बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र बंद न पाळता निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कणकवली येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
यावेळी बोलताना आम. वैभव नाईक म्हणाले, बदलापूर येथील घटना ही निषेधार्य आहे. त्यामुळेच या अन्याय विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र सदावर्ते हे कोर्टात गेल्याने न्यायालयाने बंद न पाळण्याचे आदेश दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार सर्वत्र बंद न पाळता निषेध आंदोलन केले जात आहे. सिंधुदुर्गात याला चांगला प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत ही आमची भावना आहे. जनतेच्या भावनांचा आदर राखत बंदची हाक दिली होती मात्र सरकारच्या बाजूने सदावर्ते हे सातत्याने कोर्टात जात असून सदावर्तेंच्या पाठून वार करण्याचे राज्यातील सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलने करण्यात आली होती. मोर्चे काढण्यात आले होते मात्र यावेळी जिल्हाधिकार्यांनी बंदी आदेश लागू करीत जिल्ह्यातील लोकांची दडपशाही करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्या पिढीतांना न्याय मिळल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असेही यावेळी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.