पत्रकारांचे आयडेंटी कार्ड हीच त्यांची ओळख : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पत्रकारांशी गैरप्रकार करणाऱ्या कोणाही अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर : यापुढे पत्रकारांना कोणताही त्रास पोलिसांच्याकडून होणार नाही. याबाबत पोलिसांना कडक सुचना देण्यात येईल.तसेच पत्रकारांचे आयडेंटी कार्ड हीच त्यांची ओळख असेल अडवणूक केली जाणार नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल कुसाळे यांच्या स्वागत रॅली मध्ये पत्रकार, छायाचित्रकार तसेच कॅमेरामन यांना धक्काबुक्की करणारे जिल्हा पोलीस प्रमुख असो की अन्य कोणताही शासकीय अधिकारी व कर्मचारी असो, संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल,कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नसल्याची स्पष्ट खात्रीही त्यांनी यावेळी दिली.
पॅरिस ऑलंपिक मध्ये पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र व आतंरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल कुसाळे याची काल बुधवारी भव्य स्वागत रॅली जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आली.यावेळी पोलिसांकडून पत्रकारांना अनपेक्षित धक्कादायक अनुभव पहायला मिळाला. थेट जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हेच कॅमेरामनच्या अंगावर धावून गेल्याचे, पाठोपाठ त्यांच्या कनिष्ठ अधिका-याने जेष्ठ छायाचित्रकाराशी धक्काबुक्की केली.त्यानंतर अन्य एका कर्मचाऱ्याने महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन केले.मिरवणुक मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्याने, प्रसारमाध्यमांना जाणीवपूर्वक पोलसांकडून टार्गेट करण्याचे लक्षात येताच पत्रकारांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांची कोल्हापूर प्रेस क्लब च्या वतीने शिष्टमंडळाकडून भेट घेण्यात आली.
यावेळी पत्रकारांना पोलिसांकडून प्रत्येक वेळी होत असलेली अडवणूक दिवसेंदिवस वाढतच असून, त्यामुळे कोल्हापुरातील पत्रकारांचे राज्य सरकार बरोबर जाणीवपूर्वक अविश्वासाचे वातावरण करण्यात येत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले.
दरम्यान कोल्हापुरात पत्रकारांशी संदर्भात पोलीस अधीक्षकांकडून झालेल्या गैरप्रकाराची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे.तसेच पोलीस प्रशासना कडून पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात येत असेल तर तसा प्रकार होणार नाही याबाबत पत्रकारांनी निश्चिंत राहवे,अशी खात्री देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार नेहमी पत्रकारांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.
तर पत्रकारांशी पोलीस प्रशासनाकडून झालेल्या घटनेबाबत गृहमंत्री म्हणून जाहीर माफी मागत असल्याचे सांगून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी गैरप्रकार करणाऱ्या कोणाही अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही.त्यांचा मुलाहिजा बाळगणार नाही.त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल,अशी ग्वाही यावेळी दिली.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद घडवून देण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रयत्न केले.
यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, विजय केसरकर,समीर मुजावर,बी.डी.चेचर,सुखदेव गिरी,अनिल देशमुख,दीपक घाटगे,दूर्वा दळवी आदी पत्रकारांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.