एक दिवसाची पोलीस कोठडी
सावंतवाडी : पत्नी सोबत झालेल्या वादातून पोटच्या तीन चिमुरड्या मुलांसह पत्नीवर पेट्रोल ओतून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना सावंतवाडी शहरातील वसंत प्लाझा येथे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणानंतर या निर्दयी बापाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हुसेन रजाक गडीयाली (३३, रा.कोकण कॉलनी, कोलगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार त्याची पत्नी मुमताज हुसेन गडीयाली ( २७, रा. माठेवाडा, सावंतवाडी ) हिने
सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, या घटनेत त्याचा चार वर्षाचा मुलगा अरमान याच्या नाका तोंडात पेट्रोल गेल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याला त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सावंत यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हुसेन गडीयाली याचे सावंतवाडी बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स येथे कपड्याचे दुकान आहे. पती व पत्नी यांचे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. रोजच्या प्रमाणे हुसेन गडीयाली याने आपले दुकान उघडले. त्यावेळी त्याची पत्नी आपल्या तिन्ही मुलांना घेऊन दुकानात आली. रात्री हुसेन गडीयाली हे दुकान बंद करण्यासाठी दुकानाचे शटर बंद करीत असताना पत्नी हिने आपण घरी जाणार नाही. मी दुकानातच राहणार आहे, असे ठामपणे सांगत राहिली. या कारणावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. तू दुकानातून घरी जा, घरी गेली नाहीस तर तुला व मुलांना मारून टाकीन व स्वतःला संपवून घेईन अशी धमकी त्याने दिली.
या प्रकाराने कॉम्प्लेक्स मधील दुकानदारांसह नागरिकांनी गर्दी केली. यावेळी हुसेन गडीयाली याने रागाच्या भरात लगतच्या पेट्रोल पंपावर जाऊन बाटलीतून आणलेले पेट्रोल आपल्यासह तिन्ही मुलांच्या अंगावर ओतले. त्यात एका चार वर्षाच्या मुलाच्या नाक व तोंडात पेट्रोल गेले. या घटनेची माहिती जागरूक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हुसेन गडीयाली याला ताब्यात घेतले.
त्याच्यावर मंगळवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बुधवारी हुसेन याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.