देवगड : देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने साने गुरूजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘साने गुरूजी विशेष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रंथालयाचे संचालक सदस्य आणि देवगड
महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल प्रा. एस. एस. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि साने गुरूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री सागर कर्णिक यांनी त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमामध्ये साने गुरूजींच्या गोष्टी, निबंध, त्यांचे विचार कविता यांचे सादरीकरण करण्यात आले. या अभिवाचन कार्यक्रमामध्ये स्वरा भिडे हिने बहिणभाऊ गोष्टी,सुयश गोलतकर याने सोनसाखळी, सानवी माणगावकर हिने गोष्ट अहंभावाची, आराध्या किरकिरे हिने शामची आई इ. गोष्टी सांगितल्या. महिका घाडी, चिन्मयी भडसाळे, श्वेता गांवकर, मुस्कान शेख, सारा खान, कल्पिता साठे यांनी साने गुरूजींचे निवडक विचार मांडले. विनायक म्हापसेकर यांनी मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध हा निबंध आणि यशवंती येडगे हिने मोरीगायची कथा सांगितली.
चारूलता तारकर हिने साने गुरुजींच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला व त्यांचे काही सुविचार सांगितले. श्री संजीव राऊत यांनी शामची आई या पुस्तकावर परीक्षण केले. शिवाजी ढाकणे यांनी साने गुरूजींच्या संस्काराचे महत्त्व विषद केले. श्री सागर कर्णिक यांनी साने गुरूजींविषयी आपले मनोगत मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्री सागर कर्णिक यांनी केले. आणि कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे,सहभागींचे, उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले. यावेळी ग्रंथालयाचे सचिव श्री दत्तात्रय जोशी, संचालक सदस्य श्री महेश खोत तसेच सुमित भिडे, सुरभि गोलतकर, वर्षा तारकर इ. रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.