भंडारी ज्युनिअर कॉलेजच्या “एक राखी सैनिकांसाठी ; सीमेवरच्या भावासाठी राख्या” वितरित कार्यक्रम संपन्न..
मालवण : आपल्या देशाच्या सीमेवर पहारा देऊन सैनिक देशाचे रक्षण करत असतात. त्यांच्यामुळेच आपण सामान्य नागरिक देशात चिंतामुक्त होऊन जीवन जगत असंतो. सीमा सुरक्षित नसतील तर परकीय आक्रमणाने आपले जगणे हलाखीचे होईल. प्रतिकूल परिस्थितीत सैनिक देश रक्षणाचे काम करत असतात, त्यामुळे सैनिकांसाठी भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनिनी बनविलेल्या राख्या या त्यांच्यासाठी ऊर्जा निर्माण करणाऱ्या ठरतील असे प्रतिपादन मालवणचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांनी येथे बोलताना केले.
भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवणच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही म्हणजे सलग आठव्या वर्षी “एक राखी सैनिकांसाठी- सीमेवरच्या भावासाठी” हा सैनिकांना राख्या वितरित करण्याचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मालवणचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे तसेच मालवणच्या नायब तहसीलदार (महसूल) श्रद्धा चौगुले, पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप खाडे, भारतीय सेना दलातील सेवानिवृत्त हवालदार तथा देवबागचे उद्योजक राजन कुमठेकर, पोलीस शिपाई प्रभाकर खडपकर, त्याच प्रमाणे संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार श्री. जॉन नरोना, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एच. बी तिवले, प्राध्यापक पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी श्री. तिवले सर यांनी स्वागत केले, तर प्रा. बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्रद्धा चौगुले म्हणाल्या, आज सैनिकांमुळेच आपण आनंदाने जगत आहोत, त्यांच्यामुळेच आपण सर्व सण, उत्सव आनंदाने आणि सुरक्षित वातावरणात साजरे करतो. सैनिकांना पाठविलेल्या राख्यांमुळे त्यांचा आनंद वाढतो, त्यांना प्रोत्साहन मिळते, त्यामुळे राख्या पाठविण्याचा उपक्रम अतिशय चांगला व स्तुत्य आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी उद्योजक राजन कुमठेकर, जॉन नरोना, संदीप खाडे यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी जास्तीत जास्त राख्या बनविणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या. यावर्षी विद्यार्थिनींनी २६,२०० राख्या बनविल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले. तर आभार वैभवी वाक्कर यांनी मानले.