सुशांत नाईक यांचा “त्या” पहाणी दौऱ्यावर खोचक टोला
वैभववाडी : या मतदारसंघाचे स्टंटबाज आमदार नितेश राणे यांनी परवा वैभववाडी बस स्थानकाला भेट देऊन स्टंटबाजी केली. एसटीचे विभागीय अधिकारी पाटील यांच्यावर आगपाखड केली. त्यामुळे हे सत्तेत आहेत की विरोधात आहेत असा प्रश्न इथल्या जनतेला पडला आहे. तुम्ही गेल्या दहा वर्षात आमदार म्हणून काय केले असा सवाल करीत या मतदारसंघात भ्रष्टाचाराचा चिखल झाला आहे आणि हा चिखल राणे यांनी ठेकेदार, अधिकारी यांच्या संमतीने केला आहे. असा आरोप युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.
शासकीय विश्रामगृह वैभववाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, संदीप सरवणकर, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी, सिने दिग्दर्शक दीपक कदम, खांबाळे उपसरपंच गणेश पवार, रोहित पावसकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाईक पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात आमदार नितेश राणे यांना वैभववाडी बसस्थानकातील चिखल दिसला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना बस स्थानकातील चिखल दिसत आहे. अधिकाऱ्यांवर आगपाखड करण्यापेक्षा तुम्ही आमदार म्हणून गेल्या दहा वर्षात काय केले याचा विचार त्यांनी करावा. बस स्थानकाच्या प्रश्नासंदर्भात तुमची जबाबदारी नाही का? असा सवाल करत अनेक वेळा अनेक कामांचे नारळ फोडून लोकांची दिशाभूल केली आहे. त्यांनी फक्त ठेकेदार, अधिकारी यांना हाताशी घेऊन या मतदारसंघात भ्रष्टाचाराचा चिखल केला आहे. नवीन कामे करत असताना त्यांचे सर्व ठेके हे मॅनेज केले जातात.
गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात कोणतेही ठोस काम केले नसल्यामुळे त्यांच्यावर आता गाव भेट दौरा करण्याची वेळ आली आहे. फसवा आमदार फसव्या योजना घेऊन जनतेसमोर जाणार आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात रस्त्याशिवाय कोणतेही काम नाही केले नाही. फक्त ज्या कामांमध्ये टक्केवारी मिळते तेच काम ते करतात असा आरोप केला. येत्या दोन महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे या फसव्या योजनांपासून जनतेने सावध व्हावे. असे आव्हान करीत नाईक पुढे म्हणाले, पुढचा पालकमंत्री आमदार वैभव नाईक यांच्या रूपाने जिल्ह्याला मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वैभववाडी रेल्वे स्टेशनला भेट देऊन आमदार राणे यांनी पाहणी केली. त्यांना वैभववाडी वाशियांसाठी असलेला आरक्षणाचा कोटा रेल्वेने रद्द केला आहे. ही माहिती आमदार नितेश राणे यांना नाही. हा कोटा बंद का केला याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले नाईक यांनी सांगितले.