सरपंच प्रियांका नाईक व उपसरपंच बाळु सावंत
श्रेय लाटणे ही काणेकरांची नेहमीचीच सवय
बांदा : पूर्णत्वास आलेल्या मच्छी मार्केटच्या वास्तूचे उद्घाटन करण्याचे ग्रामपंचायतीने एकत्रित बसवून ठरविले असताना सदरची माहिती उ. बा. ठा. चे सदस्य साईप्रसाद काणेकर यांना मिळताच त्यांनी उदघाटनाची अशी मागणी करणे खोडसाळ पणाचे आहे. उदघाटन होणारच आहे याची कुणकुण लागताच उलट उदघाटनाची मागणी करुन आपल्यामुळे काम मार्गी लागले असा आव आणायचा हा प्रकार निव्वळ हास्यस्पद आणि बालिश आहे. यामधून त्यांची बालबुद्धीच दिसून येते अशी टीका सरपंच प्रियांका नाईक व उपसरपंच बाळु सावंत यांनी केली आहे.
ते म्हणतात, वेळोवेळी केलेल्या लोकोपयोगी कामांची आणि विविध योजनांची सत्याधाऱ्यांबरोबर बसून माहिती घेऊन काम पूर्णत्वास जाताना त्याचे श्रेय लाटणे ही श्री काणेकरांची सवय आता सर्वांना माहीत झालेली आहे. प्रत्यक्षात बांदा गावाच्या सर्वांगीण विकासात भाजपाचे महत्त्व एखाद्या राजकीय दृष्ट्या अपरिपक्व व्यक्तीच्या विधानाने प्रभावित होऊ शकत नाही.
देऊळवाडी येथील सध्याचा पाणी प्रश्नाबाबत सुद्धा असाच प्रकार उबाठाचे सदस्य करत आहेत. मुळातच गैरसमजातून निर्माण झालेला पाणी प्रश्न सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत ग्रामस्थांना एकत्रित घेऊन सोडविण्यात आलेला आहे. सदर सदस्य अजूनही लोकांमध्ये त्या बाबतीत गैरसमज वाढवत आहे आणि त्यामुळे गावातील सलोख्याचे वातावरण कलुशीत करीत आहेत. साईप्रसाद काणेकर यांना प्रत्यक्षात लोकांच्या प्रश्नांची देणे घेणे नसून प्रत्येक वेळी स्वतःची राजकीय पोळी कशी भाजायची यातच स्वारस्य असते.
श्री काणेकर यांची अज्ञान बुद्धी समजून आमच्याकडून त्यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे कदाचित विरोधी बातम्या द्यायचे त्यांचे धाडस वाढत चालले आहे. उबाठाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. जी व्यक्ती पंचायत समिती सदस्य असताना स्वतःच्या माटणे (ता. दोडामार्ग) गावचा आणि पंचायत समिती क्षेत्राचा पाणी प्रश्न सोडू शकत नाही आणि तेही तिराळीसारखे धरण जवळ असताना, त्या व्यक्तीला बांदा ग्रामपंचायतीवर, पाणी नियोजनाच्या विषयावर मोर्चाच काय बोलण्याचाही नैतिक अधिकार नाही.
तरीही जर बाबुराव धुरी आणि काणेकर यांना उद्घाटनाच्या उत्सवांची हौस असल्यास अधिकृत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला फटाके आणि ढोल पथक घेऊन अवश्य यावे आम्ही त्यांचे निश्चितच स्वागतच करू. काणेकर यांनी स्वतःच मान्य केल्याप्रमाणे बांदा ग्रामपंचायतीवर गेली ३० वर्ष भाजपाची निर्विवाद सत्ता आहे. गेली ३०-३५ वर्षे बांदा ग्रामपंचायत तर्फे केली गेलेली विविध विकासकामे विचारात घेता लोकांकडून मिळालेली ही पोचपावतीच आहे. कोणत्याही कामाला विरोध करणे सोपे असते, पण प्रत्यक्षात कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करताना त्याच्या पूर्णत्वासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि तांत्रिकदृष्ट्या ही वेळ द्यावा लागतो तो कामांप्रमाणे बऱ्याचदा कमी अधिक असतो. म्हणून बांदा गावाच्या विकासासाठी बांदा ग्रामपंचायतचे सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही सर्व सदस्य सक्षम आहोत. आणि सर्व विकासाधीन कामे आणि विविध योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असे पत्रकात म्हटले आहे.