वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना प्रमोद कांबळी यांचा इशारा
कणकवली : पाऊस सुरू झाल्यापासून वरवडे गावातील वीज प्रवाह वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. १४ ऑगस्टपर्यंत या विजेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही तर ग्रामस्थांसह आपण वीज वितरणच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा वरवडे, कोष्टीवाडी येथील रहिवासी प्रमोद सदानंद कांबळी यांनी वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, वरवडेत तीन गावांची महसूल विभागणी झालेली आहे. फणसनगर, मध्य वरवडे, मुस्मीमवाडी, तांबळवाडी, हिवाळवाडी अशाप्रकारे गावाची भौगौलिक रचना आहे. त्यात कलमठ, कुंभारवाडीकडून एका वीज वाहिनीद्वारे पुरवठा चालू आहे. दुसरा वीजपुरवठा कलमठ, लांजेवाडीतून फणसनगरला दिलेला आहे. तर फणसनगर व वरवडे येथील संपूर्ण मध्यभागाला सातरल, कासरल या गावांतून वीजपुरवठा केलेला आहे. त्यामुळे वागदेपासून कासरल, सातरल या गावात वीज यंत्रणेत काही बिघाड झाला तर वरवडे मध्यभागातील वीज बंद राहते. याबाबत चौकशी केली तर अधिकारी सबस्टेशनवरून वीज जाते असे सांगतात. मात्र, त्याचवेळी कणकवली शहरालगतच्या गावात वीज असते. अशाप्रकारे तीन बाजूने वरवडे गावाला वीजपुरवठा केलेला असल्यामुळे स्थानिक वायरमनला काम करणे कठीण होत आहे.
गेल्या पंधरा वर्षात कुठल्याही प्रकारची वीज यंत्रणेतील दुरुस्ती, वाहिनीवरील झाडी मारणे अशी कामे झालेली नाहीत. याबाबत १२४ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढला नाही तर आपल्यासह वरवडे गावातील विजेच्या समस्यांनी पीडित व्यक्ती वीज वितरणच्या विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहोत, असे प्रमोद कांबळी यांनी या निवेदनात म्हटले आहे.