तहसिलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, शिक्षण अधिका-यांनी दिली भेट
कणकवली : कलमठ गावडेवाडी पुर्ण प्राथमिक शाळेच्या इमारतीवर गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लगत असलेला जुनाट १५० वर्षापुर्वीचा महाकाय वृक्ष कोसळला. त्यावेळी तेव्हा काही मिनिटांपूर्वीच त्या शाळेतील वर्गात बसलेली मुले वेळ घरी सोडण्यात आली होती. सुदैवाने वर्गात मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी घटनास्थळी तहसिलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, गट शिक्षण अधिकारी प्रदीप गवस यांनी भेट देत पाहणी केली.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच, स्वप्नील चिंदरकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, विजय चिंदरकर, नितीन पवार, सचिन खोचरे, मुख्याध्यापक रश्मी आंगणे उपस्थित होते. दरम्यान शाळेतील नुकसानीचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामध्ये शाळेवर वृक्ष कोसळल्याने छप्पर , काही प्रमाणात स्लॅप कोसळले, २ कपाटे, संडास बाथरुम व शाळेच्या साहित्याचे नुकसान झाले. या संदर्भात महसुल विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला. यावेळी पंचनामा करताना मंडळ अधिकारी शंकर पाटील, तलाठी सुवर्णा कडूलकर, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, विजय चिंदरकर यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.