सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : राज्यात आज दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या महसूल दिनाच्या नमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेत महसूल पंधरवड्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आमदार राजन तेली हेही उपस्थित होते.
महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य व सुलभ लाभ घेता यावा, तसेच, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने गतवर्षी १ ऑगस्ट (महसूल दिन) पासून “महसूल सप्ताह” साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
तथापि, गेल्यावर्षीच्या महसूल सप्ताहादरम्यान राबविण्यात आलेले विविध कार्यक्रम आणि शिबीरे यांचे यशस्वी आयोजन आणि मिळालेला जनप्रतिसाद विचारात घेऊन, महसूल दिनानिमित्त अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्रम राबविणे शक्य व्हावे यासाठी यावर्षी १ ऑगस्ट (महसूल दिन) पासून “महसूल पंधरवडा-२०२४” आयोजित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
या महसूल पंधरवड्यात, प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, शेती अनुषंगिक विविध दाखले, युवा संवाद, महसूल-जन संवाद, महसूल ई-प्रणाली, सैनिक हो तुमच्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा. महसूल अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण, महसूल पंधरवडा वार्तालाप, महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभ यासारखे विशेष मोहिम/कार्यक्रम / उपक्रम/ शिबीरे/महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सर्व उपक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शासनाला सहाय्यभूत ठरेल असे काम करतील असे अभिवचन प्रभाकर सावंत यांनी दिले.