सावंतवाडी / ओटवणे : गेले काही दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे चराठे येथे सामायिक घराची भिंत कोसळून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चराठा गावठणवाडी येथे गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. यशवंत बिर्जे व त्यांचा मुलगा गणपत बिर्जे हा दोघेही या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. मात्र, या घटनेनंतर घरातील अन्य कुटुंबीयांनी तसेच शेजाऱ्यांनी घाव घेत त्या दोघांनाही सुखरूप पणे बाहेर काढत उपचार अर्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
केवळ दैव बलवत्तर म्हणून भिंत कोसळूनही सुदैवानेच या घटनेत बाप लेकाचा जीव वाचला. तसेच सुदैवाने त्यांची पत्नी योगिता आणि मुलगी अक्षता दुसऱ्या खोलीमध्ये झोपल्यामुळे त्या दोघीही बचावल्या.
चराठा गावठणवाडी येथे राहणाऱ्या यशवंत गणपत बिर्जे यांच्या घरालगतच बिर्जे कुटुंबीयांचेया सामायिक जुने घर आहे. गुरुवारी पहाटे या सामायिक घराची मोठी भिंत यशवंत बिर्जे यांच्या घरावर कोसळल्याने त्या भाराने त्यांच्या घराचीही भिंत कोसळली. यावेळी गाढ झोपेत असलेले यशवंत बिर्जे आणि त्यांचा मुलगा गणपत बिर्जे हे दोघेही या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. यावेळी त्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ विनायक आणि राजू बिर्जे यांनी तात्काळ धाव घेत या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढले.
त्यानंतर शेजाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या दोघांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. चौगुले यांनी गंभीर जखमी झालेल्या गणपत बिर्जेच्या डोक्यावर खोल जखम असल्याने त्वरित शस्त्रक्रिया केली. तसेच यशवंत बिर्जे यांच्यावरही उपचार सुरू केले. त्यानंतर यशवंत बिर्जे यांना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेत बिर्जे कुटुंबीयांच्या घराचे छप्पर आणि भिंत कोसळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. बिर्जे कुटुंबीयांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून इंदिरा आवास योजनेतून त्यांनी हे घर बांधले होते. या घटनेमुळे भर पावसात बिर्जे कुटुंबीयांना बेघर व्हावे लागले आहे.