एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक यांचा आरोप
एसटी कामगार सेना भ्रष्टाचाऱ्यांचा पंचनामा करणार
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : एस.टी. महामंडळाची शयनयान बस बंद करण्या मागे खाजगी वाहतूकदार आणि महामंडळ अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंधच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक यांनी केला आहे. या बंद केलेल्या शयनयान गाड्या सुरू न झाल्यास एस.टी. कामगार सेना आपल्या पद्धतीने ह्या सगळ्याचा पंचनामा जाहीररीत्या करेल आणि होणाऱ्या परिणामास महामंडळातील या भ्रष्टाचारात हात बरबटलेले अधिकारी असतील असा इशारा देखील अनुप नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात अनुप नाईक म्हणतात, राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत एस.टी. प्रवासासाठी महिलांसाठी 50% सूट जेष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास वगैरे योजना लागू केल्या खऱ्या पण यासाठी खरच अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहेत का याचा विचार राज्य शासन करताना दिसून येत नाही. .त्यामुळे या घोषणा निव्वळ मतदारांना खुश करण्यासाठीच आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
मोठा गाजावाजा करत सिंधुदुर्ग विभागात सूरु केलेल्या लांब पल्ल्यासाठी असणाऱ्या शयनयान गाड्या मुंबईतील महामंडळाच्या कार्यालयाच्या पत्रानुस कोल्हापूर विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली. अर्थात या गाड्या वर्ग करण्यासाठी थेट आदेश हे मुंबई कार्यालयातून देण्यात आले का? की यासाठी आपल्या विभागातून ह्या गाड्या चालवण्यासाठी आपण सक्षम नाही असा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे गेला आहे? तसा अहवाल ज्या आगारातून गाड्या मुंबई, लातूर,पुणे चालत होत्या त्या आगार प्रमुखांकडून विभाग कार्यालयाकडे गेला आहे का, याचाही खुलासा गरजेचा आहे..एखादी जबाबदारी टाळायची असेल तर वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही केली हे साचेबद्ध उत्तर दिले जाते.
जर एखाद्या महिलेस 450/- रुपयात मुंबईत जायला मिळत असेल तर ती महिला दीड ते दोन हजार रूपये मोजुन खाजगी बस ने का जाईल ? .भारमान नाही हे कारण म्हणून जरी दाखवले असेल तरी या मोठ्या घोटाळ्याचा पंचनामा आम्ही एस.टी. कामगार सेना म्हणून नक्कीच करणार आहोत. भारमान कमी दाखवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लुप्त्या कोण वापरत आहे,आणि ते कोणाच्या फायद्यासाठी आहे याचाही लवकरच विभागनियंत्रक यांची भेट घेऊन जाहीर उलगडा करणार आहोत.
जर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ला, रेडी,शिरोडा,सावंतवाडी,कुडाळ येथून तसेच गोवा येथून रोज 70-80 खाजगी गाड्या चालत असतील आणि एक संपूर्ण महामंडळ राज्य सरकारच्या साथीने संपूर्ण जिल्ह्यातून 4 लांब पल्याच्या गाड्या चालवू शकत नसेल तर यातून यांच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ज्या वेंगुर्ल्यातून दिवसाला 8-10 खाजगी गाड्या चालतात तेथे अगदी फार पूर्वीपासून चालू असलेली आणि वेंगुर्ला आगाराच नाक असलेली आरोदा-परेल ही गाडी चुकीच्या पद्धतीने बंद करण्यात आली आहे,आणि या गाड्या बंद करण्याच्या षडयंत्राची सुरवात तेथूनच झाली. या बंद केलेल्या शयनयान गाड्या सुरू न झाल्यास एस.टी. कामगार सेना आपल्या पद्धतीने ह्या सगळ्याचा पंचनामा जाहीररीत्या करेल आणि होणाऱ्या परिणामास महामंडळातील या भ्रष्टाचारात हात बरबटलेले अधिकारी असतील असा इशारा एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक यांनी दिला आहे.