विरोधी पक्षांच्या नेत्यांची राजकीय स्टंटबाजी ; भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
सिंधुदुर्ग : राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकरी असो माता भगिनी असो वयोवृद्ध असो अनेक योजना आणत आहे. या योजनांमध्ये काही त्रुटी असल्या तरी त्याची दखल घेऊन तातडीने निकष व नियम बदलण्यात येतात असाच प्रकार काजू पीक अनुदान योजनेत झाला आहे. या सर्व योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी भाजप किसान मोर्चा कार्यरत आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेतील सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या त्याच पद्धतीने काजू अनुदान योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व पणनमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष उमेश सावंत, सरचिटणीस महेश संसारे, जिल्हा संयोजक बापू पंडित मंडल अध्यक्ष महादेव सावंत आदी उपस्थित होते.
चांगल्या शासकीय योजना भाजप सरकार राबवित असून महिला शेतकरी सर्वसामान्य जनता वयोवृद्ध नागरीक यांच्यापर्यंत या योजना पोहोचत आहेत. योजनेतील त्रासदायक अटी शितिल व्हाव्यात अशी सरकारची ही भूमिका आहे. व ते वेळोवेळी सरकारने सिद्ध केलं आहे. मात्र विरोधी पक्षाचे नेते केवळ राजकीय स्टंटबाजी म्हणून आंदोलने करत आहेत. केवळ स्टंटबाजी करून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असे आवाहन भाजप करीत आहे.
विरोधकांच्या या आंदोलनाला जनता फसणार नाही. कारण काजू पीक अनुदान योजनेतील ज्या त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात असे लेखी निवेदन योजना जाहीर झाल्यानंतर जिल्हास्तरीय भाजप किसान मोर्चा ने सरकारकडे पाठविले आहे. पणन विभागाकडून यावर कार्यवाही सुरू आहे असेही प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जीएसटी पावती, नोंदणीकृत खरेदीदार या जाचक अटी शिथिल करण्याची कार्यवाही पणन विभागाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे या योजनेचा चांगला फायदा या जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळणार आहे. यापूर्वी या जिल्ह्यात फळपीक विमा, प्रधानमंत्री पिक विमा, कृषी यांत्रिक योजनेतून फार मोठे अनुदान व काजू फळपीक विकास योजनेसाठी पुढील व पाच वर्षांकरिता तेराशे कोटी रुपयांचे तरतूद भाजप सरकारने केली आहे. सन २०२३ – २४ या वर्षात फळपीक विमा योजनेत ४२१९० लाभार्थी असून गणपती पूर्वी फळपीक विमा नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सन २०२३ – २४ मध्ये भात पीक नुकसान भरपाई पोटी जिल्ह्यातील १९२० शेतकऱ्यांना ३४३ हेक्टर बाधित क्षेत्राची सव्वा कोटीवर नुकसान भरपाई मिळाली आहे. कृषी यांत्रिक योजनेतून या जिल्ह्यात एकूण ४७५० शेतकऱ्यांना १०४० लाख एवढ्या अनुदानाचा लाभ दिला आहे व चालू वर्षात १३९ शेतकऱ्यांना ३१.५१ लाख रुपये आर्थिक लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व भाजपच्या जिल्हास्तरीय किसान मोर्चा संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करून केले आहे. मात्र विरोधी पक्षाचे नेते ही आकडेवारी न सांगता केवळ राजकीय स्टंटबाजी म्हणून व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल व्हावी म्हणून आंदोलनाची स्टंटबाजी करीत असल्याचेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.