8.6 C
New York
Thursday, November 28, 2024

Buy now

कुडाळ आगाराच्या समस्या सोडविणार – निलेश राणे

कुडाळ आगाराला भेट ; आगारातील समस्यांनी कर्मचारी त्रस्त

कुडाळ : राज्य परिवहन महामंडळाचे कुडाळ आगार समस्यांचे आगार बनले आहे. भाजपचे कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी आज दुपारी कुडाळ आगाराला भेट देत आगाराची पाहणी केली. यावेळी कुडाळ आगारातील वाहक आणि चालकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच निलेश राणे यांच्यासमोर वाचला आणि त्या समस्या सोडविण्याची मागणी केली. निलेश राणे यांनी देखील यातील बऱ्याचशा समस्या खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सोडविण्याची ग्वाही दिली.

कुडाळ एसटी आगारात असलेल्या गणेश मंदिरात सर्व चालक वाहक यांच्या वतीने रोशन तेंडोलकर आणि दिनेश शिरवलकर यांनी निलेश राणे यांच्या समोर समस्या मांडल्या. यामध्ये रेस्ट रुम जवळ फार मोठ्या प्रमाणात घाण असल्याने सरपटणारे प्राणी रेस्ट रुममध्ये येतात, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाहक चालकांना पहिली डयुटी संपण्याच्या आतच दुसरी डयुटी लावली जाते. या प्रक्रियेला रिबुक असे म्हणतात. त्यामुळे वेळापत्रक कोलमडते, चालक वाहकांना डयुट्या लावताना संघटना बघुन भेदभाव केला जातो, रॅम्पवरील गाड्या दुरुस्त करणारे कर्मचारी जीव मुठीत धरुन कामकाज करतात, पणजी – अक्कलकोट सारख्या अनेक डयुटया करताना वाहक चालकांच्या पगारात आर्थिक नुकसान होते, प्रशासनाकडून वाहक चालकांना अनेक वेळा वेठीस धरले जाते, वस्तीच्या गांड्यामधील वाहक चालकांना स्थानिक नागरीकांचा त्रास अनेक वेळा सहन करावा लागतो. त्याच बरोबर प्रवाशांना देखील समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये गाड्या वेळेवर न सुटणे, आगार किंवा स्थानकात संपर्कासाठी कोणतेही साधन नाही, स्टँड मध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा नाही अशा समस्या मांडण्यात आल्या.

त्याला उत्तर देताना निलेश राणे म्हणाले, मी नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जवळून बघितले आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना मी समर्थन दिले आहे. त्यांच्या मागण्या सोडविण्याचा मी नक्की प्रयत्न करणार. यातील संपर्कासाठी दूरध्वनी उपलब्ध करून देण्यासारखे काही प्रश्न मी माझ्या वैयक्तिक खर्चातून मार्गी लावणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यासारख्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारच्या अखत्यारीतील मागण्या आहेत. त्या सोडवण्यासाठी खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आपण नक्की प्रयत्न करणार, त्यासाठी तुमचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटू अशी ग्वाही निलेश राणे यांनी यावेळी दिली.

निलेश राणे यांनी त्यांनतर रेस्ट रूम ची पाहणी केली. तिथल्या अडचणी प्रत्यक्ष पाहून जाणून घेतल्या. त्याच बरोबर एसटीच्या रॅम्पमधे साठलेले पाणी सुद्धा त्यांनी पहिले. पाण्याचा निचरा होण्याबाबत आवश्यकत्या सूचना एसटी अधिकाऱ्यांना करण्याची ग्वाही त्यांनी वाहक चालकांना दिली. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, निलेश तेंडुलकर, विनायक राणे, रुपेश कानडे, बंड्या सावंत, देवेंद्र नाईक, विजय कांबळी, दीपक नारकर, राकेश नेमळेकर तसेच एसटीचे रोशन तेंडोलकर, अविनाश कुडाळकर, दिनेश शिरवलकर, महेंद्र पवार, संजय हुमरमळेकर, श्री. प्रभू, मुश्ताक खुल्ली आणि चालक,वाहक, उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!