कणकवली : पंचक्रोशी ठाकर समाज, कणकवलीच्या वतीने सिंधुदुर्गातील ठाकर समाजाच्या सी.ई.टी. नीट आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे जातपडताळणीमुळे प्रवेश रखडलेले होते. त्यासाठी विद्यार्थांचा प्रवेश सुलभ होण्यासाठी संघटनेने जातपडताळणी समिती, ठाणे सहआयुक्त दिनकर पावरा यांच्याकडे दक्षता पथक सिंधुदुर्गात पाठवून पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मागणी केलेली होती.
दक्षता पथक सिंधुदुर्गात येण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने संघटनेने ३१ जुलै २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता, याची दखल घेत सहआयुक्त दिनकर पावरा यांनी तात्काळ दक्षता पथकाला आदेश देऊन सिंधुदुर्ग दौऱ्यावर रवाना केले. पथक २९ जुलै २०२४ रोजी रात्री उशिरा दाखल झालेले असल्याकारणाने होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दाखल घेऊन सहकार्य केल्याबद्दल पंचक्रोशी ठाकर समाज, कणकवलीच्यावतीने अध्यक्ष अमित ठाकूर आणि सचिव समीर ठाकूर यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.